पुणे – मुलाच्या मृत्यूदाखल्यासाठी आईची वणवण

पुणे – घरातला कर्त्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. आधार गेल्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळलेल्या आईवर मुलाच्या मृत्यू दाखल्यासाठी गेल्या 50 दिवसांपासून वणवण फिरावे लागत आहे. मृत्यूची अद्याप नोंद झाली नसल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात येत आहे. हेच नव्हे तर अनेक नागरिकांचे दोन महिन्यांपासूनचे दाखले प्रलंबित असून, क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारून नागरिक त्रस्त झाले आहेत.

सहकारनगर भागात राहणाऱ्या महानंदा ननावरे यांच्या मुलाचा 18 मार्चला ससून रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर जास्तीत जास्त 21 दिवसानंतर मृत्यूचा दाखला मिळणे अपेक्षित होते. मात्र, असे झालेच नाही. 20 दिवसांनंतर क्षेत्रीय कार्यालयात चौकशी केली असता दररोज नोंद झाली नसल्याचे कारण देण्यात आले. शेवटी या महिलेने राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा नितीन कदम यांना हा प्रकार सांगितला.

आमच्याकडे दररोज नागरिक येत आहेत. जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांसाठी 50 ते 60 दिवसांचा कालावधी लागत आहे. विशेष म्हणजे ननावरे यांच्या दाखल्याची नोंद करण्यासाठी आरोग्य प्रमुखांपर्यंत तक्रार केली होती. या विभागाचे काम पाहणारे अधिकारी सुट्टीवर गेल्याचे कारण देण्यात आले. एखादा अधिकारी सुट्टीवर गेल्यावर महापालिकेचे कामकाज बंद झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे कदम म्हणाले.

आरोग्य प्रमुखांपर्यंत तक्रार केल्यानंतर ननावरे यांच्या दाखल्याची नोंद करण्यात आली. मात्र, यानंतरही अडचणी थांबल्या नाहीत. मुलाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला असल्यामुळे त्यांना दाखला घेण्यासाठी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात जावे लागणार आहे. पाठपुरावा केल्यामुळे, माननीयांची मदत घेतल्याने दाखल्याची नोंद झाली, मात्र अन्य नागरिकांचे काय? हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे.

जन्म-मृत्यू विभागाचा कार्यभार आपल्याकडे 2 मेपासून आला आहे. दाखले मिळण्यासाठी उशीर होत असल्यास तत्काळ अडचणी सोडवण्यात येतील. नागरिकांना लवकरात लवकर दाखले मिळावेत यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.
– सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य प्रमुख


सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टिमचा वापर करून जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी करण्याचे आदेश राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. ही यंत्रणा नवीन असल्यामुळे नोंदणी करण्याला उशीर होत आहे. सर्व काम पूर्वपदावर येण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल.
– अपर्णा बारसकर, नोंदणी अधिकारी, जन्म-मृत्यू विभाग

घरपोच दाखल्यांचे काय झाले
तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी शहरातील नागरिकाला घरपोच आणि ऑनलाइन पद्धतीने जन्म-मृत्यूचे दाखले देण्यात येतील असे सांगितले होते. क्षेत्रीय कार्यालयात जाऊन दाखले मिळत नाहीत तर घरपोच दाखले मिळवण्याचे बहुदा स्वप्नच पहावे लागेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.