पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वर दरड प्रतिबंधसाठी इटालियन व स्विस तंत्रज्ञान

  • एक्‍सप्रेस वे वरील दरड प्रतिबंध उपाय योजना अंतिम टप्प्यात

लोणावळा – चार वर्षांपूर्वी सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे प्रवासासाठी असुरक्षित बनलेल्या पुणे-मुंबई एक्‍सप्रेस मार्गावरील खंडाळा (बोरघाट) घाटमाथा परिसरातील दरडप्रवण क्षेत्रासह अन्य ठिकाणी प्रवाशांना सुरक्षित व निर्धोक प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सैल व धोकादायक झालेल्या दरडी हटविण्याचे आणि त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. दरडी कोसळण्यास प्रतिबंध घालण्यासाठी प्रथमच इटालियन व स्विस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पुणे-मुंबई एक्‍सप्रेस मार्गावर 22 जून व 19 जुलै 2015 रोजी खंडाळा (बोरघाट) घाटातील खंडाळा आणि आडोशी बोगद्याजवळ दोन मोठ्या दरडी कोसळून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. या दोन्ही दरडीच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा एका महिन्याच्या कालावधीत खंडाळा घाटातील खंडाळा बोगदा ते आडोशी बोगदा या आठ किलोमीटर अंतरावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या दरडीच्या घटनांमुळे प्रवासासाठी जलदगती संबोधला जाणारा पुणे-मुंबई एक्‍सप्रेस महामार्ग असुरक्षित बनला होता. या दरडींच्या घटनांची राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने दखल घेत 27 जुलै 2015 रोजी खंडाळा (बोरघाट) घाटातील घाटमाथा परिसरातील सैल व धोकादायक झालेल्या दरडी हटविण्याचे आणि त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. त्यानंतरही 2016 काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामुळे दरडीच्या दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी महामंडळाने आय.आय.टी., मुंबई यांच्या सल्ल्यानुसार दरडी कोसळण्याच्या प्रवण क्षेत्रात प्रतिबंधक उपाययोजनाची आखणी केली. त्यानुसार, आडोशी बोगदा (मुंबई दिशने), अमृतांजन पूल (मुंबई व पुणे दिशने) व खंडाळा बोगदा येथे कंत्राटादारामार्फत जिओमार्फालॉजिकल (भूगर्भ) तंज्ञ यांच्या पथकाला पाचारण करून तपासणी व सर्वेक्षण करणे, दगडी पृष्ठभागाचे लूज स्केलींग करणे व ढिले झालेले बोल्डर्स काढणे, डोंगर माथ्यावर व आवश्‍यक ठिकाणी गटर खोदकाम करणे, रॉक बोल्टींग करणे, नेटींग करणे, डायगोनल टाय रोप बसविणे, शॉटक्रिंट करणे, आवश्‍यक ठिकाणी गॅबियन वॉल्स बांधणे आदी कामांसाठी एकूण 52 कोटी 19 लाख 98 हजार 451 रुपये खर्च आला.

या कामाचा आढावा घेण्यात आल्यानंतर आय.आय.टी., मुंबई यांनी प्रस्तावित केल्यानुसार आणखी दोन कामे प्रगतीपथावर आहेत. ती कामे अनुक्रमे 56 कोटी 38 लाख व 861 कोटी रुपयांची आहेत. याच कामासाठी जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये महामार्ग पोलिसाच्या पूर्व परवानगीने टप्याटप्याने एक्‍सप्रेस महामार्गावरील वाहतूक 15 मिनिटासाठी बंद ठेवली होती. दरडीवरील सैल झालेले दगड काढण्यात आले. आता तेच काम अंतिम टप्यात आले आहे. दरड प्रवण क्षेत्रात स्टील वायर जाळी बसविणे, रॉक बोल्टिंग करणे, ड्रेनेजसुधारणेची कामे करणे, गॅबीयन वॉल बाधणे आदी कामे ही मे. पायोनियर फाउंडेशन इंजिनिअर्स प्रा. लि. मार्फत करण्यात येत आहेत. अंदाजे सव्वाशेच्या आसपास मनुष्यबळ प्रतिबंधक उपाय योजनाच्या कामामध्ये व्यग्र आहेत.

या कामात प्रथमचे हाय टेन्साईल स्ट्रेन्थ वायरच्या जाळ्या व रॉक बोल्टींगच्या कामासाठी इटालियन व स्विस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या कामी आय.आय.टी., मुंबई येथील रॉकमेकॅनिक्‍स विभाग प्रमुख टी.एन.सिंग हे तांत्रिक संकल्पना व स्पेसिफिकेशन देत असून, मे. स्टुप कन्सल्टंट प्रा. लि. हे पर्यवेक्षण करीत आहेत.

एक जूनपासून घाटात घाट निरीक्षण (जीओटी) पथक राहणार तैनात
या प्रतिबंधनात्मक उपायाबरोबरच एक्‍सप्रेस महामार्गावर टोलवसुलीचे कंत्राट असलेली मे. एमआयपीएल (मे. म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि.) या कंपनीमार्फत जीओटी ही टीम 1 जून 2018 पासून दरड प्रवण क्षेत्रात कार्यरत राहणार आहे. त्या टीमच्या सुपरवायझरच्या नेतृत्तवाखाली लोडर, पोकलेन, जेसीबी, दोन टिपर, 10 मजूर व सुपरवायझर या यंत्रसामुग्रीसह बोरघाट पोलीस चौकी येथे तैनात राहिल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)