पुणे – मालमत्ता व्यवस्थापन विभागात शुकशुकाट

पुणे – एकीकडे कामासाठी येणारे नागरिक आणि पालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांची कामाची लगबग सुरू असतानाच भूमी-जिंदगी विभागातील चार कक्षांमधील टेबल खुर्च्या अक्षरश: रिकाम्या होत्या. या कक्षांमध्ये हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेही कर्मचारी उपस्थित नव्हते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तरे दिली जात असून नागरिकांची कामे रखडत असल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये भूमी जिंदगी विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये नागरिक त्यांची कामे घेऊन येत असतात. परंतु, शुक्रवारी कक्ष क्रमांक 43 ते 46 या चारही कक्षांमधील अधिकारी आणि कर्मचारी गायब असल्याचे दिसत होते. सर्व टेबल खुर्च्या रिकाम्या होत्या. कार्यालयात कोणीही नसताना कक्षांमधील दिवे आणि पंखे मात्र तसेच सुरू होते. अनेक नागरिकांना हात हलवत परत जावे लागले.

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, काही जण प्रशिक्षणाला आणि काही जण फिल्डवर गेले असल्याचे सांगण्यात आले. परंतु, यातील नेमक्‍या कोणकोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे आणि नेमके कोण अधिकारी-कर्मचारी फिल्डवर गेले आहेत, याबाबत त्यांना माहिती देता आली नाही. त्यामुळे भूमी-जिंदगी विभागात नेमके चाललेय काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शनिवारी बुद्ध पौर्णिमानिमित्त आलेली सुट्टी आणि रविवार यामुळे काहीजण दुपारीच कार्यालयामधून पसार झाल्याचे पहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.