पुणे – मानव-बिबट्या संघर्ष एकत्रित प्रयत्नांतूनच थांबेल

डॉ. अजय देशमुख : पाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त निवारा आवश्‍यक

पुणे – गेल्या काही काळात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. यामुळे मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, हा संघर्ष थांबविण्यासाठी केवळ वनविभागावर अवलंबून राहता येणार नाही. मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी एकात्मिक प्रयत्न आवश्‍यक असल्याचे माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जंगलातून बाहेर पडून उसाच्या शेतात राहणारा बिबट्या, शेतमजूर तसेच आसपासच्या वस्तीतील नागरिक यांच्यातील संघर्ष सातत्याने वाढत आहे. हा संघर्ष पूर्णत: रोखणे अशक्‍य असले, तरी तो कमी करण्याचे प्रयत्न नक्‍कीच करता येतील. मात्र, त्यासाठी वनविभागासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण आणि स्थानिक नागरिक व प्रशासन यांचे एकात्मिक प्रयत्न आवश्‍यक आहे. विशेषत: ग्रामीण भागात रात्री शेतीचे काम करावे लागू नये, यासाठी दिवसा विजेची सोय उपलब्ध करून देणे, सौर ऊर्जेवर आधारित यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना होईल. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या भागांमध्ये दिवसा वीज उपलब्ध नसल्याने लोक रात्री शेतीची कामे करतात. त्याच वेळी बिबट्याकडून त्यांच्यावर हल्ला केला जातो, असे समोर आले आहे. तसेच वाड्या-वस्त्यांमधील पाळीव प्राणी हे या बिबट्यांचे अन्न असते. त्यांच्या शोधात तो या परिसरात येतो. मात्र, या ठिकाणी पाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त निवारा असेल, तर याप्राण्यांची शिकार करणे बिबट्याला अवघड होईल. या परिसरात अन्न मिळत नसल्याचे लक्षात येताच, बिबट्या त्या परिसरापासून दूर जाईल. बंदिस्त निवारा बांधण्यासाठी सरकारी योजनांमधून मदत नक्कीच उपलब्ध करता येईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

भटकी कुत्री, डुकरांचा बंदोबस्त व्हावा
शहरी भागात वावरणारी भटकी कुत्री आणि डुकरे हे बिबट्यासाठी लगेच आणि सहजपणे उपलब्ध होणार अन्न आहे. यामुळेच बिबट्याचा विस्तार शहरी भागाकडे होत आहे. शहरी भागातील भटकी कुत्री आणि डुकरे यांची योग्य व्यवस्था ठेवल्यास शहरी भागातील बिबट्यांचा विस्तार रोखणे शक्‍य असल्याचेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)