पुणे – माननीयांकडून शासन योजनांचेही “क्रेडिट’

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत रंगवलेल्या भिंतींवर संकल्पना म्हणून नातेवाईकांचे नाव

पुणे – स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत भिंती रंगविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. यामध्ये महापालिका खर्च करणार असून, तो सर्वसामान्यांच्या खिशातून जाणार आहे. असे असताना माननीयांनी स्वत:च्या प्रभागात रंगवलेल्या भिंतींवर संकल्पना म्हणून स्वत:चे नाव लावले आहे. मात्र, काही माननीयांनी थेट नातेवाईकांचेच नाव लावण्याचा “विनोद’ केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कधी नाम फलकांना पक्षाच्या झेंड्याचा रंग, कधी दिशादर्शक कमानींवरील अक्षरांवर फ्लेक्‍स, तर कधी महापालिकेच्या भिंतीवर पक्षाचे चिन्ह, अशा वेगवेगळ्या मार्गांनी सध्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या पैशांचा वापर पक्षाच्या प्रचारासाठी आणि स्वतःच्या चमकोगिरीसाठी सुरू केला आहे. आता तर नगरसेविकेच्या नातेवाईकाचेच नाव संकल्पना म्हणून भिंतींवर रंगवण्यापर्यंत मजल गेली आहे.

पक्षनिष्ठा, वर्चस्व दाखवण्यात सत्ताधारी नगरसेवकांमध्ये स्पर्धाच लागली आहे. पूर्वी वॉर्डस्तरिय निधीतून केलेल्या कामांचे बोर्ड नगरसेवक लावत असत. मग ते शौचालय असो किंवा बाकडे टाकणे असो. परंतु त्यानंतर निवासस्थानाकडे, संपर्क कार्यालयाकडे असे बोर्डही रस्त्यावर दिसू लागले आहेत. आता त्यात भर पडली आहे ती केंद्र आणि राज्यांच्या योजनांचा. “स्वच्छ सर्वेक्षण’ ही त्यातीलच एक योजना आहे. या योजनेचा प्रचार सध्या सुरू केला आहे. यातूनच विविध “स्लोगन्स’चा वापर करून भिंती रंगवल्या जात आहेत. स्वारगेट परिसरातही अनेक ठिकाणी भिंती रंगवल्या जात असून, येथे “नगरसेविका स्मिता वस्ते यांच्या प्रयत्नातून..’ असे रंगवलेल्या भिंतींवर लिहिले आहे. मात्र, संकल्पनेत माजी नगरसेवक विनोद वस्ते यांचे नाव टाकण्यात आले आहे. विनोद वस्ते हे स्मिता यांचे दीर आहेत. योजना केंद्राची, पैसा महापालिकेचा तोही नागरिकांच्या खिशातून कररूपाने आलेला असे असताना माननीयांच्या घरच्यांना फुकटची प्रसिद्धी का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पुणेकरांनी मोठ्या विश्‍वासाने भाजपच्या हाती महापालिकेची सत्ता दिली. मात्र, नागरिकांची सत्ताधाऱ्यांकडून कामे करायची सोडून पुणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी केली जात आहेत. सत्तेची धुंदी चढल्यामुळे महापालिकेच्या साधन सपत्तीचा दुरुपयोग केला जात आहे. नगरसेवकांची नावे टाकणे आक्षेपार्ह नाही, मात्र त्यांच्या घरातील इतर व्यक्तींचीही नावे टाकली जात असतील तर महापालिकेची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही धुंदी भविष्यात पुणेकरच उतरवतील.

– चेतन तुपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)