पुणे – महाविद्यालये, की पार्किंग वसुलीचे अड्डे?

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्येही विद्यार्थ्यांच्या वाहनांसाठी पार्किंग मोफत असावे, अशी मागणी जोर धरत आहे. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाने पार्किंग नियमावली तयार केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांकडून पार्किंग शुल्काच्या नावाखाली आर्थिक वसुली सुरू आहे.

महाविद्यालय व संस्थांकडून पार्किंग शुल्क वाजवीपेक्षा जास्त घेत असल्याच्या विद्यार्थी संघटनांच्या तक्रारी होत्या. त्यानंतर तत्कालिन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी पार्किंग शुल्काबाबत नियमावली तयार करण्यासाठी समिती नेमली होती. माजी अधिष्ठाता डॉ.अशोक चासकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पार्किंग नियमावली तयार केली होती. त्यानुसार सर्व महाविद्यालयांनी या नियमावलीचे पालन करावे, असे विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक काढले होते.

महाविद्यालयात सायकल व दुचाकीवरून येणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत पार्किंग असावे, दुचाकी पार्किंगसाठी माफक शुल्क असावे, त्यात व्यावसायिकता नसावी, पार्किंगची जागा दररोज स्वच्छ करावी, पावसाचे पाणी, वाहनांची व्यवस्था, वाहन तळावरील फरश्‍यांची डागडुजी, गाड्या लावण्यासाठी रंगांच्या पट्ट्यांची आखणी, पुरेसा प्रकाश उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे पार्किंगची देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त करावा लागणारा सेवक आणि त्यासाठी द्यावा लागणारा खर्च याचा विचार करावा. तसेच महाविद्यालयात पार्किंगसाठी 50 रुपये मासिक पास, 500 रुपयांमध्ये वार्षिक पास आणि 300 रुपयांमध्ये सहामाही पास असे पार्किंग शुल्क आकारावे. तसेच पास न घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दररोज 3 रुपये पार्किंग शुल्क घ्यावे, पार्किंग आकारणीचा तक्ता महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात किंवा पार्किंगच्या ठिकाणी लावावा. आदी स्पष्ट निर्देश विद्यापीठाने दिले होते.

विद्यापीठाची नियमावली कागदावरच
विद्यापीठाच्या पार्किंग नियमावलीचे एकाही महाविद्यालयाने गेल्या पाच वर्षांत या नियमावलीचे पालन केले नाही. उलट प्रत्येक वर्षी नवीन कंत्राटदार नियुक्त करून वाहन शुल्क वसुली सुरूच ठेवली, हा सर्व प्रकार थांबवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.