पुणे – महामार्गांची कामे गतीने व्हावीत

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर : विविध कामांचा आढावा

पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे विभागातील संबंधित यंत्रणेशी समन्वय ठेवून राज्य महामार्गाची कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागातील राज्य रस्ते विकास महामंडळाअंतर्गत रस्त्याच्या कामांचा आढावा बैठकीत दिल्या.

विभागीय आयुक्त आणि “एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक पार पडली. यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, “एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, सहव्यवस्थापकीय संचालक सी.पी. पुलकुंडवार उपस्थित होते. यावेळी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे माहिती दिली.

एमएसआरडीसी अंतर्गत पुणे विभागातील रस्त्याच्या कामांचा आढावा डॉ. म्हैसेकर व मोपलवार यांनी घेतला. ते म्हणाले, “प्रामुख्याने पुणे-मानगाव-दिघी, सातारा-टेंभूर्णी, नगर-पुणे या मार्गातील भूसंपादनाचे प्रस्ताव “एमएसआरडीसी’ अधीक्षक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे दाखल करावेत तसेच 3-ए अधिसूचना काढून घ्यावी. डॉ. म्हैसेकर म्हणाले, “एमएसआरडीसी’ने संबंधित जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा करुन भूसंपादनाचे प्रश्‍न तत्काळ सोडवावेत. राज्य महामार्गाची कामे वेळेत होण्यासाठी “एमएसआरडीसी’ने संबंधित यंत्रणेशी व जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवून भूसंपादन व अन्य अनुषंगिक कामे गतीने पूर्ण करावीत. आवश्‍यक त्या ठिकाणीच भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी.’

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी मंत्रालय, मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील राज्य महामार्गांच्या कामांचा आढावा घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.