गणेश सोनूने यांचा क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढला
पुणे : पुणे महापालिकेत राज्यशासनाकडून प्रतिनियुक्तीने अधिकारी पाठविणे सुरूच असून भोर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वारूळे यांची महापालिकेत नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, वारूळे यांच्याकडे वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे. हा पदभार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांच्याकडे होता. मात्र, सोनूने यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनास, क्षेत्रीय कार्यालय आणि वृक्षप्राधिकरण समितीचा पदभार असल्याने त्यांचे आपत्ती व्यवस्थापनाकडे दूर्लक्ष होत असल्याची टिका नगरसेवकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे वारूळे यांची नियुक्ती होताच सोनूने यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे.
वारूळे हे भोर नगर परिषदेत मुख्याधिकारी होते. त्यांच्या बदलीचे आदेश राज्यशासनाकडून 24 जुलै रोजी काढण्यात आले होते.त्यानंतर लगेच वारूळे हे 25 जुलै रोजी महापालिकेत रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडे क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनूने यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त पदभारामुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात लक्ष देता येत नसल्याची टिका नगरसेवकांकडून करण्यात येत होती. सोनूने यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनास, क्षेत्रीय कार्यालय आणि वृक्षप्राधिकरण समितीचा पदभार असल्याने, त्यांनीही काही पदभार कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून त्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता वारूळे यांची शासनाकडूनच नियुक्ती करण्यात आल्याने सोनूने यांच्याकडील पदभार कमी करण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.