पुणे – महापालिकेचे पार्किंग म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’

सुरक्षा व्यवस्थेची हेळसांड

पुणे – महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे प्रश्‍न सुटता सुटत नाहीत, अशी स्थिती असताना आणखी नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या इमारतीमधील कडी-कोयंडे चोरीला गेल्याची घटनाही तशी ताजीच आहे. यावरून तेथील सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे लक्षात येते. यात भर म्हणून आता या इमारतीचे पार्किंगही “आओ- जाओ घर तुम्हारा’ झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये गेटच्या आत येताना किमान कोणाकडे आले आहे, कोठे जायचे आहे याची नोंद करून घेतली जात होती आणि त्यानंतरच वाहन आत सोडले जात होते. तसेच तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता होता. मात्र नव्या विस्तारित इमारतीमध्ये तळघरात पार्किंग असल्यामुळे तेथे राबता नाही. कोण गाडी आणून लावतो, त्याचे महापालिकेतच काम आहे का, याची विचारणाही केली जात नाही. त्यामुळे महापालिकेचे पार्किंग हे बाहेरच्यांसाठीही मोफत आणि सुरक्षित वाहनतळ झाले आहे.

महापालिकेचा बस थांबा तेथेच असल्याने अनेकजण महापालिकेच्या इमारतीच्या बेसमेण्टमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये गाड्या पार्क करतात आणि शहरात आपापल्या कामावर निघून जातात. त्यानंतर संध्याकाळीच वाहन घेण्यासाठी येतात.

वास्तविक महापालिकेच्या नव्या इमारतीमध्ये सद्यस्थितीत पक्षांचे काम पूर्णपणे सुरू झाले नाही. सध्यातरी शिफ्टींगचेच काम सुरू आहे. याशिवाय कामकाजाची सर्व कार्यालये जुन्याच इमारतीत असल्याने नागरिकांची वर्दळ जुन्याच इमारतीमध्ये आहे. असे असताना नव्या इमारतीचे पार्किंगही अक्षरश: फुल्ल झालेले असते.

याशिवाय या विस्तारित इमारतीच्या समोरच्या बाजुला चार चाकी लावण्यासाठी आयतीच जागा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. तेथेही आरामात बाहेरून आलेल्यांच्या चारचाकी गाड्या पार्क केलेल्या दिसून येतात. वाहनतळात “येणाऱ्या’ आणि वाहनतळातून “बाहेर’ पडणाऱ्या गाड्यांसाठी वेगवेगळे गेट करण्यात आले आहेत. असे असतानाही त्याचे पालन केले जात नाही. त्यावर अंकुशही सुरक्षा विभागाकडून ठेवला जात नाही. महापालिकेची इमारत ही कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पुण्यामध्ये अलिकडच्या काळात घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यांमध्ये वाहनांचाच वापर मोठ्या प्रमाणात केला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका इमारतीत अशाप्रकारे सुरक्षा व्यवस्थेची हेळसांड ही अत्यंत घातक ठरणारी आहे.

नवीन इमारतीतही दारूपार्ट्या
जुन्या इमारतीत दारूपार्ट्या या नित्याच्याच झाल्या होत्या. पावसाळ्यात दारूच्या बाटल्यांमुळेच ड्रेनेज तुंबल्याचा प्रकारही घडला होता. असे असतानाही तेथील पार्ट्या थांबल्या नाहीत. तोच प्रकार नवीन इमारतीतही सुरू झाला आहे. येथेही कोणाचा धरबंध नसल्याने रात्री दारूपार्ट्या सुरू असल्याचे येथे नुकत्याच सापडलेल्या बाटल्यांवरून दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)