पुणे : बोगस वायरिंगचे “कनेक्‍शन तोडले’

गोदामावर छापा : व्यापाऱ्याच्या मुसक्‍या आवळल्या, 43 लाखांचा माल हस्तगत
देशव्यापी रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय

पुणे – पॉलिकॅब कंपनीच्या नावाखाली निकृष्ट आणि बनावट वायर्स विकणाऱ्या व्यावसायिकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्या गोदामातून 43 लाखांचा माल जप्त करण्यात आला. बनावट माल ग्राहकांच्या माथी मारणाऱ्या या व्यवसायाचे जाळे निरनिराळ्या राज्यांमध्ये पसरले आहेत. त्या सखोल तपासासाठी पोलिसांची पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आली आहेत.

दिनेशसिंग रुपसिंग राजपुरोहित (42, रा. शुक्रवार पेठ) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मूळ उत्तम दर्जाच्या कंपनीच्या नावाखाली बनावट व निकृष्ट वायर्स पुरवण्याचा उद्योग राजपुरोहित व काही मंडळी करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.

राजपुरोहित याचे तपकीर गल्लीत “पवन इलक्‍ट्रिकल्स’ नावाचे दुकान आहे. पोलिसांनी शुक्रवारी बनावट ग्राहक पाठवून या दुकानातून बनावट वायर्स विकल्या जात असल्याची खात्री केली व राजपुरोहित याला बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीत त्याने आपले गोदाम कसबा पेठेत असल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी तेथे छापा टाकून बनावट वायर्स व त्याचे बॉक्‍स जप्त केले. यामुळे अन्य व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, संदीप जमदाडे, पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक जयदीप पाटील, अंमलदार सचिन ढवळे, प्रवीण भालचिम, रमेश राठोड, महेंद्र पवार, शितल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

…येथेही हवाला कनेक्‍शन
बनावट वायर्स तयार करून ते विकण्याच्या या व्यवसायात शहरातील किमान 15 मोठे व्यापारी गुंतले असावेत, असा पुणे पोलिसांचा संशय आहे. याबाबतचे सर्व व्यवहार हवाला रॅकेटच्या माध्यमातून केले जात होते. त्यांचे मॉड्यूल नष्ट करण्याचे प्रयत्न आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. शहरात मागील काही वर्षात वायरिंगमुळे दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. बनावट वायरच्या वापरामुळे हे प्रकार घडतात, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.