पुणे – बेशिस्त वाहतुकीने ‘कोंडी’

गंगाधाम चौकाकडून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्याचा श्‍वास कोंडला

पुणे – शहरात सुरू असलेल्या दुरुस्ती आणि विकासकामांमुळे अनेक रस्त्यांवर कोंडी होत आहे. तर काही ठिकाणी रूंद रस्ते, बेशिस्त वाहतूक यामुळेदेखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गंगाधाम चौकाकडून कात्रजकडे जाणारा रस्ता देखील सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासलेला आहे. अरूंद रस्ता, तीव्र चढण, रस्त्याला लागून असलेली मार्बल, विटांचे गोडाऊन विविध मंदिरे आणि निवासी इमारती यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच भेडसावते. विशेषत: सकाळ आणि सायंकाळी या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते.

मंदिर, शैक्षणिक संस्थांकडे जाणारा “शॉर्टकट’
गंगाधाम चौकाजवळ आशापुरा माता मंदिर आणि आई माता मंदिर या मंदिरांमुळे येथे सकाळी आणि सायंकाळी भाविकांची गर्दी होती. दरम्यान, मंदिरांना स्वत:ची पार्किंग व्यवस्था नसल्याने मंदिरामध्ये येणाऱ्यांना वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागतात. त्याचबरोबर कोंढवा, बिबवेवाडी आणि कात्रज परिसरांमध्ये अनेक शैक्षणिक संस्था आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत. या परिसरामध्ये असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणारे-येणारे विद्यार्थी, पालक, शालेय वाहतूक व्यवस्थांसह मंदिरांमध्ये येणारे भाविक याच मार्गाचा वापर करत असल्याने या मार्गावरील रहदारी दिवसेंदिवस वाढत आहे.

या परिसरामध्ये गोडाऊन, व्यावसायिक दुकानांची भर 

सिमेंट, टाईल्स आदी बांधकामासाठी आवश्‍यक असणाऱ्या गोडाऊनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांच्या वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर गोडाऊनमध्ये अंतर्गत वाहने उभी करण्याची सोय नसल्याने वाहनांमध्ये माल चढविण्या आणि उतरविण्यासाठी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. परिणामी, अरुंद रस्त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या मोठ्या वाहनांच्या बाजूने दुचाकी सोडल्यास अन्य वाहने ये-जा करू शकत नाहीत.

तीव्र चढ आणि उतारासह अंतर्गत रस्त्यांमुळे घ्यावी लागते खबरदारी
गंगाधाम चौकाकडून कात्रजकडे येताना सुरुवातीला तीव्र चढ आणि उताराचा सामना नागरिकांना करावा लागतो. हे कमी की काय असे वाटतानाच चढ आणि उतार संपल्यावर रस्त्याची रुंदी कमी असल्याने चालकांना अचानक थांबावे लागते. या रस्त्यावरील उतारामुळे सावकाश जाणारी आणि चढामुळे वेगाने आलेल्या वाहनांना “ब्रेक’ लावल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. गंगाधाम चौकाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मुख्य रस्त्याला जोडण्यात येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांमुळे रहदारीमध्ये भर पडत आहे. अंतर्गत रस्त्याच्या धोकादायक वळणांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सावधपणे प्रवास करावा लागत आहे.

“मी गेली दहा वर्षे या परिसरात राहात आहे. पूर्वीपेक्षा येथील रस्त्याची परिस्थिती सुधारली असली, तरी रस्त्याची रूंदी पुरेशी नसल्यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होत असतो. त्यातच जड वाहने याच मार्गावरून जात असल्याने त्यात अजून भर पडते. अनेकदा या मार्गावरून जाणारी मालवाहू वाहने जुनी असल्याने मध्येच बंद पडतात. त्यामुळे परिस्थिती बिकट होते. यावर योग्य उपाय काढला पाहिजे.’
– हिमांशु शहा, रहिवासी


“आधीच तीव्र चढाईचा अरूंद रस्ता त्यात जड वाहने आणि बेशिस्त वाहनचालक यामुळेच या रस्त्यावर जास्त वाहतूक कोंडी होते. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावर दोन ठिकाणी “क्रॉस रोड’ आहेत. त्यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. जड वाहनांना या रस्त्यांवरून जायला बंदी केल्यास ही समस्या सुटण्यास मोठी मदत होईल.’
– शुभम कोरे, रहिवासी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.