पुणे – फुकट्यांवर तिकिट तपासणीसांची ‘नजर’

तिकिट तपासणीसांची संख्या वाढविली


फुकट्या प्रवाशांची संख्या वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांनी घटली

पुणे – फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने तिकिट तपासणीसांची संख्या वाढविली आहे. हा प्रयोग प्रशासनाला चांगलाच फायद्याचा ठरला आहे. या तिकिट तपासणीसांची संख्या वाढविल्यापासून गेल्या महिनाभरात फुकट्या प्रवाशांची संख्या वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांनी घटली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या महसुलातही तेवढीच वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आगामी काळात तिकिट तपासणीसांची संख्या आणखी वाढविण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

पीएमपीएमएल बसेसच्या माध्यमातून दररोज किमान बारा ते साडेबारा लाख प्रवासी प्रवास करत असतात. बसेसची संख्या कमी असली तरीही प्रवाशांची आजही पीएमपीच्या बसेसलाच सर्वाधिक पसंती असते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करत असले तरीही प्रशासनाला दररोज जेमतेम दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. त्यामुळे महसुलात नेमकी कोठे गळती होते, याचा शोध प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यावेळी फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. विशेष म्हणजे साडेबारा लाख प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडे अवघे पन्नास ते साठ तिकिट तपासणीस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यातूनच या फुकट्या प्रवाशांना आणखीनच वाव मिळत होता.

त्यामुळे पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. त्यानुसार सेवा ज्येष्ठतेनुसार वाहक आणि चालकांना तिकिट तपासणीसांची पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गेल्या महिनाभरात त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे या सर्वांना तातडीने या पदाची ओळखपत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे या कामगारांनी त्यांच्या कामाला तातडीने सुरुवात केली आहे, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

वाहकांवरही ठेवणार वचक…!
फुकट्या प्रवाशांमुळे प्रशासनाच्या महसुलात घट होत आहे. त्यामुळे या प्रवाशांना आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्यात येत आहेत. मात्र, ही कारवाई करत असतानाच कुंपणच शेत खात असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनातील बहुतांशी वाहक प्रवाशांना तिकिट न देता त्यांचे पैसे स्वत:च्या खिशात घालत आहेत. या प्रकाराचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे अशा वाहकांवरही नजर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.