पुणे – प्यायला नाही पाणी पण, नळाला मीटर

नगर रस्ता परिसरात बसणार सर्वांत आधी मीटर

पुणे – पाण्यासाठी सर्वाधिक दुर्भिक्ष्य असलेला शहरातील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर रस्ता, खराडी, चंदननगर, विमान नगर तसेच वडगावशेरी परिसरात सर्वात पहिल्यांदा पाण्याचे मीटर लागणार आहेत. महापालिकेची भामा-आसखेड योजना सुरू होण्याच्या मार्गवर असल्याने हे मीटर बसविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे 56 चौरस किलोमीटर परिसरात हे मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

शहरात समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुमारे साडेतीन लाख पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. त्याची सुरूवात प्रशासनाने नवीन वर्षात केली असून आतापर्यंत सुमारे 60 मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, शहरात या वर्षभरात केवळ नगर रस्ता परिसरातच भामा-आसखेड योजनेतून पुरेसे पाणी दिले जाणार असल्याने या भागात पाणी मीटर लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भामा-आसखेड योजनेच्या पाण्याच्या टाक्‍या तसेच समान पाणी योजनेच्या कामाचे एकत्रित आराखडा करण्यात आला आहे. तर या भागात समान पाणी योजनेसाठी सर्वांत कमी नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार असून जुन्या जलवाहिन्या कायम ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे या भागात या योजनेसाठी सर्वांत आधी पाणी मीटर लावणे संयुक्‍तिक होणार असल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे मीटर बसविण्यासाठी प्रशासनाने या भागाची निवड केली असल्याचे सांगण्यात आले.

पाणी समस्या सुटण्याचा दावा
महापालिकेकडून शहराच्या पूर्व भागासाठी भामा-आसखेड धरणातून वर्षाला सुमारे 2. 68 टीएमसी पाणी घेतले जाणार आहे. हे पाणी केवळ नगर रस्ता, येरवडा, धानोरी, विश्रांतवाडी, चंदननगर, खरडी, वडगावशेरी, कल्याणी नगर या भागासाठी असणार आहे. ही योजना डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे या भागात सर्वांत आधी 24 तास पाणी देण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे या भागात पाणी मीटर लावण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. प्रामुख्याने प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने सोसायटयांमध्ये तसेच जे नागरिक मागणी करतील, त्यांना वैयक्तिक स्वरूपात हे मीटर दिले जाणार आहेत.

पाण्याची बोंबाबोंब सुरूच
गेल्या काही वर्षांत नगर रस्ता परिसरात मोठय प्रमाणात नागरिकरण वाढलेले आहे. मात्र, त्या तुलनेत या भागात महापालिकेस पाणी पुरवठा करणे शक्‍य झालेले नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या भागात सर्वाधिक पाण्याच्या टॅंकरची मागणी असते. तर, काही भागात दोन दिवसांतून एकदा तर लोहगाव भागात सात ते आठ दिवसांतून एकदा पाणी दिले जात आहे. त्यामुळे यंदा प्यायला पाणी मिळत नसतानाच; दुसऱ्या बाजूला मीटर बसत असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.