पुणे – पोटच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव

15 लाख आणि पतीकडून सदनिका मिळविण्यासाठी केले कृत्य


महिलेसह मैत्रिणी आणि मित्राला ठोकल्या बेड्या

पुणे – पतीने दुसरे लग्न केल्याने त्याच्याकडून 15 लाख रुपये आणि सदनिका मिळविण्यासाठी महिलेने पोटच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचला. परंतु, हडपसर पोलिसांनी तिचा हा डाव उधळत महिलेसह तिला मदत करणाऱ्या मैत्रिणी आणि तिच्या मित्रालाही बेड्या ठोकल्या.
संगीता चांगदेव जगताप (38, रा. शेवाळवाडी), मैत्रिण संगीता गणेश बारड (29, रा. लोणी काळभोर, अभिजीत अशोक कड (रा. कोरेगाव, मुळ. ता. हवेली) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 4 वर्षांच्या आर्यन नावाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याची आई संगिता जगताप हिने केली होती. एका पांढऱ्या स्कॉर्पिओमधून आलेल्या व्यक्तींनी त्याचे अपहरण करण्यात आल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. त्यावेळी तपास अधिकारी संजय चव्हाण आणि इतरांनी गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून फिर्यादीनेच हा कट रचल्याचे उघड केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे.

संगीता जगताप हिला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. दरम्यान, तिचे काही दिवसांपूर्वी पहिल्या पतीसोबत असतानाच तिचे चांगदेव जगतापशी सूत जुळले. पहिल्या पतीचे निधन झाल्यावर तिने जगतापशी लग्न केले. जगतापपासून तिला आर्यन नावाचा मुलगा झाला. चांगदेव जगताप हा शिर्डी येथे सिड फॉर्मचा व्यवसाय करतो. तो आई-वडिलांसोबत तेथेच राहतो. महिन्यातून कधीतरी तो पुण्यात येतो. दरम्यान, त्याने काही दिवसांपूर्वी तेथे दुसऱ्या एका महिलेशी लग्न केल्याचे तिला समजले. त्यानंतर तिने त्याच्याकडे शिर्डी येथे जाऊन त्याचा जाब विचारला आणि त्याच्याकडे समझोता करण्यासाठी 15 लाख रुपये आणि एका सदनिकेची मागणी केली. मात्र, जगतापने तिची मागणी फेटाळून लावत आर्यनचा ताबा मागितला. तिने त्यास नकार दिला, मात्र चांगदेवने तिला खर्चाला पैसे देण्यास बंद केल्याने तिची अडचण झाली होती. यासंदर्भात तीने मैत्रिंनीशी चर्चा केली. यानंतर मैत्रिण संगीता बारड आणि तिचा मित्र अभिजीत कड याच्याशी संपर्क साधून आर्यनच्या अपहरणाचा बनाव केला. त्यानंतर आर्यनचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. ही माहिती तीने पतीलाही दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर अपहरण झालेल्या गाडीची माहिती मिळाली, असे पोलिसांनी तिला सांगितले. यामुळे घाबरून जाऊन तीने अभिजीत आणि संगीताला आर्यनला सोडून देण्यास सांगितले. या दोघांनीही मुलाला एका घराजवळ सोडले. तेथील व्यक्तीने मुलाकडे चौकशी केल्यावर त्याला घरी सोडले. मुलगा मिळाल्याची खात्री झाल्यावर दोघेही पसार झाले होते.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे, पोलीस हवालदार युसूफ पठाण, राजेश नवले, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंडे, अकबर शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.