पुणे – पुनर्वसित गाळ्यांमध्ये फिरस्त्यांचा संसार

महापालिकेचे लक्षच नाही

पुणे – मेट्रोच्या हबसाठी स्वारगेट चौकातील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्यात आल्यानंतरही या स्टॉलमध्ये कोणीच येण्याला तयार नाहीत. परिणामी या गाळ्यांमध्ये फिरस्त्यांनी संसार थाटला असून, तेथे ते थेट राहण्यासाठीच गेले आहेत. असा प्रकार होत असतानाही याकडे ना ज्यांना गाळे मिळाले त्यांचे लक्ष आहे ना महापालिकेचे.

मेट्रो हबसाठी स्वारगेट चौकातील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करून त्यांना सणस ग्राऊंड, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि पाटील प्लाझा जवळ गाळे देण्यात आले. एकूण 106 स्टॉल्स आणि 20 हातगाड्यांपैकी सणसग्राऊंड आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथे 61 आणि उर्वरित 45 जणांचे पाटील प्लाझा येथे पुनर्वसन करण्यात आले आहे.

लॉटरी पद्धतीने ते गाळे वाटून त्यांच्याकडे ते हस्तांतरीतही केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु त्याठिकाणी एकही गाळेधारक व्यवसायासाठी आला नाही. त्यामुळे हे गाळे असेच पडून आहेत. ज्यांना गाळे मिळाले आहेत असे सांगितले जात आहे तेथे त्यांनी कुलुपही लावले नाही. त्याचा फायदा फिरस्त्यांनी घेतला असून, तेथे त्यांनी थेट संसारच मांडला आहे.

गाळ्यांच्या बाहेर मस्तपैकी चूल पेटवून स्वयंपाक केला जातो आणि या गाळ्यांमध्ये गाठोडी आणि अन्य साहित्य ठेवले गेले आहे. अशाप्रकारे येथे अतिक्रमण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

मेट्रो हब होणार, की नाही?
स्वारगेट येथे भूमिगत मेट्रोचे काम सुरू असताना याठिकाणी भुयार सापडले आहे. त्यामुळे येथे मेट्रो हब होणार, की नाही याविषयी अजूनही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. येथे हब होणार नाही, असे या गाळेधारकांना वाटते आणि पुन्हा एकदा येथेच आपल्याला व्यवसाय करता येईल अशा आशा त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या आहेत. मात्र येथे हब न करण्याविषयीचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. भुयाराबाबतची माहिती महापालिकेला पाठवली असून, त्याबाबत अद्याप काही कळवले नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.