पुणे – पीएमपी बसेसचे सेफ्टी ऑडिट रखडले

– आवाक्‍याबाहेर खर्च, काम थांबवले ः नव्याने निवीदा प्रक्रिया राबविणार

गणेश राख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – गेल्या काही दिवसांत पीएमपी बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने या पार्श्‍वभूमीवर बसेसचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी निवीदा प्रक्रिया राबवून एका खासगी संस्थेला ऑडिटचे काम देण्यात आले होते. मात्र, ऑडिटसाठी एकच संस्था पुढे आल्याने सुरुवातीला प्रायोगित तत्वावर हे काम देण्यात आले. यानुसार संस्थेने पिंपरी डेपोतील जवळपास 50 बसेसचे ऑडिटही पुर्ण केले. मात्र, ऑडिटसाठी कंपनीकडून आकारण्यात येणारी अवाजवी रक्कम आणि ताफ्यातील एकूण बससेची संख्या पाहता प्रशासनाला हे परवडणारे नसल्याने प्रशासनाकडून ऑडिटचे सुरु असलेले काम थांबवण्यात आले आहे. यामुळे पीएमपी बसेसचे सेफ्टी ऑडिट पुन्हा एकदा रखडले असुन यासाठी आता नव्याने निवीदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना गेल्या काही महिन्यांत मार्गावर तसेच डेपोमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पीएमपी बसचे फायर सेफ्टी ऑडिट झाले आहे का? असा सवाल नागरिकांकडून केला जाऊ लागला. यानंतर गाड्या पेटण्याचे नेमके कारण काय आदींसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सर्व पीएमपी गाड्यांचे फायर सेफ्टी ऑडिट पुर्ण करुन घेण्याचे सुचविले होते. यानंतर पीएमपी प्रशासनाने महापालिकेसमोर फायर ऑडिट करुन देण्याची मागणी केली. त्यावर महापालिकेने फायर ऑडिट करणाऱ्या काही खासगी संस्थांची यादी पीएमपी प्रशासनाला दिली. यामधील एका क्राफ्ट नावाच्या खासगी संस्थेने पुढाकार घेत पीएमपी अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिक नयना गुंडे यांच्यासमोर कशा प्रकारे फायर ऑडिट केले जाईल याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. मात्र, एकच संस्था असल्याने गुंडे यांनी या संस्थेला प्रायोगित तत्वावर पिंपरी डेपोतील बसेसचे काम दिले. संस्थेकडून करण्यात येणारे काम, ऑडिटसाठी येणारा खर्च पाहून पुढे कंपनीला काम द्यायचे की नाही हे ठरणार होते. त्यानुसार संस्थेने डेपोतील जवळपास 50 बसेसचे ऑडिटही केले. मात्र, संस्थेकडून प्रतिबस ऑडिटसाठी येणारा खर्च जास्त असून पीएमपीच्या ताफआतील एकूण बस पाहता हा खर्च आवाक्‍याबाहेर जात आहे. यामुळे प्रशासनाकडून ऑडिटचे काम थांबवण्यात आले आहे. मात्र, यामुळे आता पीएमपीच्या ताफ्यातील बसेसचे सेफअटी ऑडिट रखडले आहे.
——————

– सेफ्टी ऑडिट महत्वाचे का?

पीएमपी ही पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूकीचा मुख्य कणा आहे. पीएमपी बसने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 11 लाख आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीची बसेसची संख्या कमी आहे. पीएमपीच्या ताफ्यात स्वतःच्या सुमारे 1 हजार 400 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमपी बसेसला मार्गावर आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या आठ महिन्यात जवळपास नऊ पीएमपी बसेसनी पेट घेतला होता. काही दिवसांपुर्वी विमानगर येथे पीएमपीच्या चालु मार्गावरील एका गाडीला अचानक मोठी आग लागली होती. यामुळे पीएमपी गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ऑडिट महत्वाचे समजले जाते.
——————-

महापालिकेकडून काही खासगी संस्थांची यादी देण्यात आली होती. यातील क्राफ्ट या कंपनीने पुढे येत न कशा प्रकारे काम केले जाईल याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले होते. यानूसार या संस्थेला प्रायोगित तत्वावर सेफ्टी ऑडिटचे काम देण्यात आले होते. मात्र, संस्थेकडून ज्या पध्दतीने काम केले जात आहे त्यानुसार येणारा खर्च मोठा असून न परवडणारा आहे. यामुळे सध्यातरी हे काम थांबवण्यात आले आहे. मात्र, यासाठी नव्याने निवीदा प्रक्रिया राबवण्यात येऊन पुढील काही दिवसात काम पुर्ण केले जाईल.
नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)