पुणे – पाण्यासाठी पालिकेची ‘महा’जुमलेबाजी?

महावितरणकडे बोट दाखवित पाणीपुरवठा बंद

पुणे – पाणीबंद ठेवण्याच्या विषयात महापालिकेने महावितरणच्या नावाखाली जुमलेबाजी सुरू केली आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात महावितरणकडून कोणतीही दुरुस्ती केली जाणार नसताना ती असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. तसा खुलासाही महावितरणने प्रसार माध्यमांना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दि.7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असल्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. त्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीशिवाय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडूनही देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे नमूद केले आहे.

मात्र, महावितरणने अशी कोणतीच देखभाल दुरुस्ती आमच्याकडून केली जाणार नसल्याचा स्पष्ट आणि लेखी खुलासा दिला आहे. महावितरणकडून वीजयंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीची जी कामे प्रस्तावित आहेत त्याचा महापालिकेच्या जलकेंद्रांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे गुरूवारी कोणत्याही जलकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवणार नसल्याचेही या खुलासापत्रात म्हटले आहे.

पाणीकपात नाही असे सांगताना महापालिका सतत गुरूवारी पाणीबंद ठेवत आहे. तसेच त्यासाठी महावितरणचा आधार घेत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या आधीही महापालिकेने हेच कारण देत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा अनेकदा बंद ठेवला आहे. त्यावेळीही जलकेंद्रांना हाय कॅपॅसिटीची उन्नत लाईनने वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीचा आणि ती बंद ठेवण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. अन्य ठिकाणी वीजपुरवठा बंद असला तरी येथील विद्युत पुरवठा सुरूच ठेवला जातो, असेही सांगण्यात आले आहे. तरीही, महापालिकेने महावितरणच्या खांद्यावर बंदूक ठेवून देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)