पुणे विभागात 25 टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरण्या
पुणे – गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यांना पाणी टंचाईचा फटका बसू लागला आहे. पुणे विभागात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र 23 हजार 300 हेक्टर असून, त्यापैकी 5847 हेक्टर म्हणजेच 25 टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात चाराटंचाईचा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारापिकांची पेरणी करण्याकडे वळू लागले आहेत. परिणामी, विभागात उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे यंदा पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे मागील चार ते पाच महिन्यांपासून पाणीटंचाई भासू लागली आहे. त्याचा फटका रब्बी हंगामासह उन्हाळी पेरण्यांना बसू लागला आहे. आतापर्यंत उन्हाळी मक्क्याची 1925, बाजरीची 2248, उन्हाळी मुगाची 17, भुईमुगाची 1667 हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सध्या विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकाची काढणी पूर्ण होत आली आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग या पिकांच्या पेरणीस सुरवात झाली असून, पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील श्रीगोंदा, संगमनेर या तालुक्यांत पेरणी झालेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी गव्हाची काढणी पूर्णत्वास आली आहे. उन्हाळी हंगामातील उन्हाळी बाजरी व भुईमूग या पिकांच्या पेरणीस सुरवात झाली आहे. काही ठिकाणी बाजरी, भुईमूग ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यात हवेली, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत पेरणी झाली आहे. सोलापूरमध्ये गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.