पुणे – पाणी कपात, का दिलासा

पाटबंधारे विभाग, महापालिकेची आज बैठक

पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून शहरात दिवसाआड पाणी कपात लावायची का आहे तोच पाणी पुरवठा कायम ठेवायचा याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार असून महापालिका आयुक्तांनी संयुक्त बैठक बोलाविली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍के कमी पाणीसाठा आहे. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन तसेच पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी मागील महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरासाठी 15 जुलैपर्यंतचा पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, हा साठा राखीव ठेवताना शहराचा पाणी वापर प्रतिदिन 1,350 एमएलडी गृहीत धरण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात पालिकेकडून 1,400 ते 1,500 एमएलडी पाणी घेतले जात असल्याचा दावा पाटबंधारे विभागाकडून केला जात असून हा वापर आणखी काही दिवस असाच कायम राहिल्यास महापालिकेस निर्धारीत करून दिलेल्या 15 जुलैपर्यंत धरणातील साठा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पालिकेने दैनंदिन पाणीवापर 1,350 एमएलडीच करावा अथवा सध्या शहरात एकवेळ देण्यात आलेल्या पाण्यात आणखी कपात करून दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच, वाढीव पाणी कोट्यासाठी पालिकेने जलसंपत्ती नियमक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार दिलेले पाण्याचे अंदाजपत्रकही पाटबंधारे विभागाने त्रुटी असल्याचे सांगत पालिकेस परत पाठविले आहे. या दोन्ही विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले. तसेच, या बैठकीनंतरच कपात आणखी वाढवायची की आहे तसा पाणीपुरवठा कायम सुरू ठेवायचा हे सुद्धा निश्‍चित होणार आहे.

निवडणुकीमुळे टळली होती कपात?
महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यापासूनच पाणीकपात आणखी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपात लागू केल्यास अडचणीची शक्‍यता व्यक्त करत ही कपात करण्यात येऊ नये, अशा अप्रत्यक्ष सूचना पालिकेच्या वरिष्ठांना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कपात निर्णय स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र, आता धरणातील पाणी वेगाने कमी होत असल्याने पुढील काही दिवसांत निर्णय घेणे अपरिहार्य असल्याने ही बैठक बोलविण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

पाण्याच्या अंदाजपत्रकावरही होणार चर्चा
बैठकीत महापालिकेने पाण्याचा कोटा वाढवून मिळावा यासाठी सादर केलेल्या अंदाजपत्रकावरही चर्चा होणार आहे. पालिकेने पाटबंधारे विभागाकडे 17 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पालिकेने 56 लाख 20 हजार नागरिकांची संख्या दाखविली आहे. ही लोकसंख्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्‍यक असल्याचे कारण पाटबंधारे विभागाने दिले आहे. या शिवाय, पालिकेने सुमारे 35 टक्‍के पाण्याची गळती दाखविली असून हा आकडा सुमारे 4.75 टीएमसी आहे. तर जलसंपत्ती नियमक प्राधिकरणाच्या तरतूदीनुसार, पाणीकोट्यात गळती धरली जात नाही. त्यामुळे हे गळतीचे पाणी वगळून फेर प्रस्ताव सादर करावा, असे पत्र पालिकेस देण्यात आले आहे. या दोन्ही विषयांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.