पुणे – पदाधिकाऱ्यांचा जुन्या इमारतीतून निघेना पाय

कार्यालयांच्या सजावट, फर्निचरचे काम सुरू असल्याचे दिली जाताय कारणे

पुणे – महापालिकेच्या विस्तारित इमारतीमध्ये महापौर, गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसचिव कार्यालय यांचे स्थलांतर झाले आहे. असे असताना जुन्या इमारतीमधून अद्यापही सभागृहनेते आणि उपमहापौर यांचा पाय निघत नाही, असे दिसत आहे. त्यांच्या कार्यालयांच्या सजावटीचे, फर्निचरचे काम सुरू असल्याने ते स्थलांतरित केले नाही, असे कारण दिले जात आहे. मात्र हे काम कधीपर्यंत संपणार याची मुदत मात्र कोणीही देऊ शकला नाही.

महापालिकेचा विस्तार आणि कामाचा ताण वाढल्याने अस्तित्वात असलेली इमारती कामासाठी अपुरी पडत असल्याने पालिका प्रशासनाने 50 कोटींपेक्षा जास्त खर्च करून पालिका भवनाच्या बाजूला असलेल्या जागेत नवीन विस्तारीत इमारत बांधली आहे. तिचे उद्‌घाटन 21 जून 2018 रोजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. इमारतीचे काम अपुरे असताना उद्‌घाटनाचा घाट घातल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यानंतर महिन्याभरात कामे पूर्ण होऊन सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये तसेच नगरसचिव कार्यालयाचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होईल, असे आश्‍वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. याला दहा महिन्याचा कालावधी उलटला तरीही नव्या इमारतीमधील अनेक कामे अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

उद्‌घाटनानंतर तब्बल 7 महिन्यांनी 17 जानेवारी रोजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधीपक्षनेते आणि इतर गटनेत्यांच्या कार्यालयांचे स्थलांतर झाले. त्यानंतर महिनाभरात नगर सचिव कार्यालयाचे स्थलांतर झाले. मात्र, फर्निचरची कामे झाली नसल्याने उपमहापौर आणि सभागृहनेते कार्यालयांचे अद्याप स्थलांतर होऊ शकलेले नाही. येथील फर्निचरची कामे कासवगतीने सुरू असल्याने कार्यालयांचे स्थलांतर होत नाही. इमारतीमधील उपहारगृहाच्या फर्निचरचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. काही ठिकाणी फरशी बसविणे, रंगकाम करणे बाकी आहे.

स्वच्छतागृहांची अनेक कामे अर्धवट
इमारतीमधील स्वच्छतागृहांची झालेली अनेक कामे अर्धवट आणि निकृष्ट दर्जाची आहेत. आता पुढील पावसाळा सुरू होण्याला एक ते दीड महिनाच शिल्लक राहिला आहे. मागील पावसाळ्यात झालेली फजिती लक्षात घेता, केलेली उपाययोजना योग्य आहे की नाही, याची खात्री करून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा सभागृह गळण्यासारखी उद्‌घाटनाच्या दिवशीच झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणजे मिळवले, अशी प्रतिक्रिया दिली जात आहे. एवढेच नव्हे तर या इमारतीच्या तळघरामध्ये पाण्याचे जिवंत झरे आहेत. पावसाळ्यात या झऱ्यांच्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. वरून गळणारे पाणी आणि जमिनीतून झऱ्याच्या रुपाने येणारे पाणी यामुळे या इमारतीच्या तळघरात तळे होऊ नये यासाठी प्रशासनाने काही प्रयत्न केले आहेत का, याची माहितीही मिळू शकली नाही.

पुढील आठवड्यात स्थलांतर; नेत्यांचे आश्‍वासन
फर्निचरची कामे त्त्वरीत पूर्ण करून 1 मेपर्यंत कार्यालयाचा ताबा देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले आहे. तर 30 एप्रिल रोजी नवीन कार्यालयात आम्ही जाणार असल्याचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.