पुणे -पथनाट्याच्या शिदोरीमुळे अभिनयात यशस्वी : मकरंद अनासपुरे

पुणे – “पथनाट्याची शिदोरी’ हेच माझ्या आजवरच्या अभिनय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे खरे गमक आहे. पथनाट्यामुळे अभिनय करताना प्रसंगावधान, हजरजबाबीपणा तसेच कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढणे, आदी गोष्टी सहज शक्‍य होतात. मग, ते नाटक असो किंवा चित्रपट किंवा सूत्रसंचालन आणि हे मी स्वानुभवातून सांगतो, असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.

सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या रौप्य महात्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या प्रकट मुलाखती दरम्यान ते बोलत होते. यावेळी अभिनेते सुबोध भावे यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते. अनासपुरे यांनी मराठीसाठी हक्‍काची चित्रपटगृहे नसल्याची खंत व्यक्‍त केली तसेच मल्टिप्लेक्‍सचे तिकीट दर हे सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याचे सांगितले. यावर उपाय म्हणून मराठीसाठी हक्‍काची चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याबरोबरच माफक तिकीट दर ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयुष्यात ठरवून केलेल्या गोष्टींपेक्षा न ठरवता केलेल्या गोष्टी जास्त यशस्वी होतात, असा माझा अनुभव असल्याचे सुबोध भावे यांनी बोलताना नमूद केले. माझ्या करिअरमध्ये खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल हा जितेंद्र, शौनक अभिषेकी आणि त्यांचे संगीत येण्यामुळे झाला, असे भावे म्हणाले.

मराठी चित्रपटांकडे मनोरंजनात्मक चित्रपट म्हणून पाहिले जात नाही, तर समाजप्रबोधनपर चित्रपट म्हणून पहिले जाते आणि हे निश्‍चितच योग्य नाही. आज मराठी प्रेक्षक वर्ग हा मनोरंजनासाठी इतर भाषेतील चित्रपटांकडे वळतो. मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांच्यावर कायम एक प्रकारचे दडपण ठेवले जाते की, या चित्रपटातून तुम्ही काय संदेश समाजाला देऊ इच्छिता? प्रेक्षक हे सुज्ञ आहेत. तेव्हा चित्रपटातून काय घ्यायचे हे त्यांना माहिती आहे. त्याची जबाबदारी दिग्दर्शक किंवा कलाकार यांच्यावर टाकणे बरोबर नसल्याचे भावे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)