पुणे – निमंत्रित वाऱ्यावर; कार्यकर्ते जोरावर

पुणे – स्थळ एका पक्षाचे प्रचार कार्यालय. एका वक्‍त्याचे विचार ऐकण्यासाठी काही निमंत्रितांना बोलावण्यात आले होते. रोजचाच तो शिरस्ता असल्याने निमंत्रित तेथे पोहोचले. या निमंत्रितांसाठी पक्षाने खाण्याचे पदार्थ आणले होते. ते रोजच आणले जातात. मात्र संध्याकाळी येथे खायला मिळते हे माहीत असल्याने निमंत्रितांशिवाय अनेक आगंतुक येथे आधीच हजर असतात. निमंत्रितांना खायला देताना मधल्यामध्ये हे आगंतुकच प्लेट पळवताना दिसतात. त्यामुळे निमंत्रितांपर्यंत ती प्लेट जातच नाही आणि पदार्थ मधल्यामध्ये गट्टम होतात हे दिसून आले.

वारंवार हा प्रकार होत असल्याने आयोजक वैतागले आहेत. परंतु कार्यकर्तेच असल्यामुळे काही बोलूही शकत नाही असा प्रकार त्यांचा झाला आहे. शेवटे वैतागून उमेदवाराने स्वत: संपर्क प्रमुखाला फोन करून ही बाब सांगितली आणि निमंत्रितांपर्यंत आधी प्लेट जाते का ते पहा, असे आवर्जून सांगितले.

त्यावरून संपर्क प्रमुख कार्यक्रमातून थेट प्लेटवाटपाच्या ठिकाणी आले. त्यांनी वाढप्यांना स्वत:बरोबर घेऊन निमंत्रित कोण आहेत हे दाखवले. आणि त्यांना आधी प्लेट द्या हे सांगितले. असे करूनही मधल्यामध्ये प्लेट पळवापळवी झाली. संपर्क प्रमुख दिसल्यावर हातातील पदार्थ लपवण्यापर्यंत या आगंतुकांची मजल गेली. परंतु पदार्थही संपले; हतबल झालेला प्रमुख तेथून निघून गेला आणि निम्मेअधिक निमंत्रकांचा खाऊ आगंतुकांनी गट्टम केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.