पुणे – नदी किनारी सामूहिक प्रयत्नांतून पाणथळाचा विकास

पुण्यातील विठ्ठलवाडी परिसरात प्रयोग यशस्वी


नदी संवर्धनासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्यांची किमया

पुणे – एकेकाळी मंदगतीने वाहणारा शुद्ध पाण्याचा प्रवाह राडा-रोड्यांत दबला गेला. कधीकाळी सुंदर पक्ष्यांचा अधिवास असलेला प्रदेश काही दिवसांपूर्वीपर्यंत केवळ सिमेंटचे ब्लॉक, कचऱ्याचे ठिकाण बनले होते. मात्र, शहरातील काही कार्यकर्ते पुढे सरसावले. त्यांनी जिद्दीने हा राडारोडा हटवत पाण्याच्या प्रवाह पुनरुज्जीवित करत परिसराचा कायापालट केला आणि आज तोच प्रदेश पाण्याचा मंद प्रवाह असणारा एक सुंदर पाणथळ प्रदेश म्हणून विकसित झाला आहे.

ही किमया साध्य केली, ती शहरातील जीवितनदी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी. नदी संवर्धनासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विठ्ठलवाडी येथे पाणथळ जागेचे पुनरुज्जीवन करण्यात यश मिळविले आहे. अशाच प्रकारे शहरातील इतर ठिकाणीदेखील पाणथळ प्रदेशाचा विकास करण्यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत संस्थेच्या आदिती देवधर म्हणाल्या, “नदी परिसंस्थेतील एक महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पाणथळ जागांची नदी संवर्धनात महत्त्वाची भूमिका असते. मात्र, मुळा-मुठा नदी किनारी बांधकामांच्या राडारोड्यामुळे हे पाणथळ प्रदेशच बुजले गेले आहे. साहजिकच याचा विपरित परिणाम नदीवर देखील होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन, आम्ही सामूहिक प्रयत्नांद्वारे पाणथळ जागा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. विठ्ठलवाडी येथे चार गोमुखांतून पाण्याचा प्रवाह येतो. पण, हे गोमुख राड्यारोड्याखाली दबले होते. त्यामुळे साहजिकच हे पाणी त्याठिकाणी अडून ते दूषित बनले होते. त्यामुळे मच्छर, कीटक आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तो राडारोडा हटवून ती जागा स्वच्छ केली. तसेच याठिकाणी छोटे दगड, माती यांचा एक नैसर्गिक बांध तयार करून पाणी वाहण्यासाठी जागा निर्माण केली. हळूहळू अशुद्ध पाणी वाहून जाऊन त्याठिकाणी शुद्ध पाण्याचा प्रवाह वाहू लागला. यासाठी अनेकांनी मदत केली विशेषत: लहानमुले अतिशय उत्साहाने याकामात सहभागी झाले होते.

विठ्ठलवाडी प्रमाणेच शहरातील इतर ठिकाणीदेखील नदी काठावरील पाणथळ जागा विकसित केल्यास त्याचा नदीसंवर्धनासाठी खूप उपयोग होईल,’ असेही आदिती देवधर यांनी सांगितले.

पाणथळ म्हणजे काय ?
पाणी आणि जमीन यांचा समावेश असलेला ठिकाण म्हणजे पाणथळ जागा होय. नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या जागेला पाणथळ जमिनी म्हटले जाते. या जमिनीत छोटे कीटक, जीवजंतू असतात. आपण भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करतो. याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकतो. परंतु पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. तसेच बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्‍याचे प्रमाण कमी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)