पुणे-नगर रस्त्याला 224 कोटींची तात्काळ मंजुरी

संग्रहित छायाचित्र....

शिक्रापूर- पुणे-नगर रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गा केल्यामुळे या रस्त्याचे काम सुरू होण्यास विलंब होणार आहे. या मार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंना एक लेन वाढविण्याची मागणी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागील आठवड्यात केली होती. यावर मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या एका बैठकीत या मार्गाचा प्रश्न उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांनी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगून या मार्गाला तात्काळ मंजुरी देण्याची सूचना नुकतीच केली आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील खांदवेनर, वाघोली, शिक्रापूर अशा एकूण 26 किलोमीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा एकेक लेन वाढविण्यासाठी हायब्रीड ऍन्यूटी योजनेअंतर्गत 224.24 कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. अवर सचिव प्रशांत पाटील यांच्या सहीचे पत्र आमदार पाचर्णे यांच्या हातातही लगेच देण्यात आले. तर पुणे- नगर रस्त्याबाबत बोलताना आमदार पाचर्णे यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाच्या मंजुरीनंतर या रस्त्याच्या कामाबाबत वेळ लागेल असे दिसू लागताच आम्ही या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकेक लेन वाढविण्यासाठी पाठपूरावा सुरू केला. यास मुख्यमंत्र्यांनीही लगेच प्रतिसाद दिल्याने या कामाची निविदा होऊन काम पावसाळा संपला की, पुढील दोनच महिन्यात सुरू होईल. पुणे-नगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकेक लेन वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 224 कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला मंजुरी मिळाली दिली. तातडीचे काम म्हणून मंजुरी मिळालेल्या या कामाला येत्या दोन महिन्यातच प्रारंभ करण्याच्या सूचनाही यावेळी फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)