पुणे – दौंडमध्ये बाह्यवळणाच्या कामाला गती

अडीच हेक्‍टर जमीन अधिग्रहण : प्रवाशांचे 45 मिनिटे वाचणार

पुणे – उत्तर भारताला जोडणाऱ्या दौंड रेल्वे जंक्‍शनजवळ बाह्यवळण (कॉर्ड लाइन)चे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे दौंड जंक्‍शनमध्ये अर्धा तास ताटकळत थांबणाऱ्या गाड्यांचा वेळ 45 मिनिटांनी वाचणार आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून जमिन अधिग्रहण करून कामाला सुरूवात केली आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना ग्रीन सिग्नल मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना हे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

ब्रिटीशकालीन दौंड जंक्‍शन हे पुण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. उत्तरेकडील राज्ये जोडणाऱ्या दौंड जंक्‍शनचा विस्तार संथगतीने सुरू आहे. मात्र, प्रवाशांच्या मागण्या काही प्रमाणात दुर्लक्षित झाल्या आहेत. दौंड- पुणे लोकल, विस्तारीकरण, विद्युतीकरण यासाठी दौंड रेल्वे प्रवासी संघाला पाठपुरावा करावा लागला. त्यातून आंदोलने, निवेदने देऊन काम मार्गी लावण्यासाठी प्रवासी संघ प्रयत्नशील आहे.

ब्रिटीशकालीन दौंड जंक्‍शन उत्तर भारत आणि सोलापूर जिल्ह्याला संलग्नीत आहे. पुण्यावरून उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांची दररोजची संख्या सुमारे वीस ते पंचवीस आहे. दौंड जंक्‍शनमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या आल्यानंतर या गाड्यांना सुमारे 45 मिनिटे इंजिन बदलण्याच्या कारणास्तव थांबावेच लागते. हा वेळ वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पाटस रेल्वे स्थानकापासून दौंड स्थानकाच्या आधी मालू स्लीपर कारखान्याच्याजवळून बाह्यवळण (कॉर्ड लाईन)चे काम हाती घेतले आहे. या बायपास रेल्वे लाईनचे कामाने गती पकडली आहे. हे बाह्यवळण 1.1 किलोमीटर आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाला 2.5 हेक्‍टर जमीन अधिग्रहण करावी लागली आहे. परिसरातील एकूण 19 शेतकऱ्यांना यासाठी 12.5 कोटी रुपयांचा मोबदला द्यावा लागला आहे. या प्रकल्पाची एकूण बजेट 30 कोटी रुपये आहे. हे काम एप्रिलअखेरीस पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. हे काम पूर्ण झाल्यावर तांत्रिक कामासाठी (इंजिन फिरवण्यासाठी) लागणारा कालावधी वाचणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे सुमारे 45 मिनिटे वाचणार आहेत.

लूटमारीच्या घटनांच्या पायबंद
दौंड जंक्‍शनमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या कार्ड लाईनजवळ प्लॅटफॉर्म होणार आहे. मात्र, तिथे जाण्यासाठी दौंड- काष्टी रस्त्यावरून सोनवडीमार्गे कॉर्ड लाईनकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळखाऊ आणि खर्चिक होणार आहे. मात्र, दौंड जंक्‍शनपासून कॉर्ड लाइनपर्यंत कमी वेळेत पोहचण्यासाठी आता पक्‍का रस्ता तयार करण्याची गरज आहे. या गाड्या यापूर्वी जंक्‍शनमध्ये थांबत होत्या. त्यावेळी 45 मिनिटे वेळ वाया जात होता. त्याच दरम्यान, लूटमारीच्या घटना घडत असल्यामुळे रेल्वे पोलिसांवर ताण पडत होता. या लूटमारीच्या घटना गेल्या वीस वर्षांपासून सुरू होत्या. त्यामुळे लूटमारीच्या घटनांना पायबंद बसणार असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षा दर्जेदार होणार आहे.

दौंड रेल्वे स्थानकापासून ते आता नवीन कॉर्डलाईन स्थानकापर्यंत जाण्यासाठी पक्‍का रस्ता नाही. तरी तो रस्ता करण्याचे काम देखील लवकरात लवकर करण्यात यावे. तसेच आता दौंड स्थानकात फ्लॅट उपलब्ध नाही, या कारणाने औटरजवळ गाडी देखील थांबणार नाही. पुण्यावरून सायंकाळी 6.25 वाजता आझाद हिंद (हावडा) एक्‍स्प्रेस गेल्यानंतर किमान दोन गाड्या सायंकाळी 6.30 वाजता मेनलाईन मल्टिपल युनिट (मेमू) हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस- दौंडमार्गे बारामतीपर्यंत सोडावी. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता पुण्यावरून निघून फक्‍त उरुळी आणि केडगाव स्थानकात थांबणारी जलद मेमू लोकल सोडावी. सकाळी 5.30 वाजता 6.30 वाजता 7.05 वाजता 8.15 वाजता जलद लोकल फक्‍त केडगाव आणि उरुळी येथे थांबणारी आणि त्यानंतर 11 वाजता या वेळेत सोडण्यात यावी. दौंड रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन गाड्यांचे वेळापत्रक दैनंदिन प्रवाशांच्या सोयीचे करण्यात यावे.
– विकास देशपांडे, सचिव, दौंड रेल्वे प्रवासी संघ.

Leave A Reply

Your email address will not be published.