पुणे – दौंडच्या लोकोशेडला निधींचे टॉनिक

17 कोटींची मंजुरी : ट्रॅक विस्तारीकरणाची प्रतीक्षाच

पुणे – पुणे शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड जंक्‍शनचा विस्तार आणि गरज, व्याप्ती वाढली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात दौंडमधील लोकोशेडसाठी 17 कोटी 63 लाख 95 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

देशातील 24 वा लोकोशेडचे काम मार्गी लागणार आहे. सिग्नल इंटर मिडिएट लॉकसाठी एक कोटींचा निधी मंजूर केला आहे. परंतु पुणे- दौंड मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी निधी मंजूर केला नसल्यामुळे दौंड जंक्‍शनच्या कामाला ब्रेक’ लागण्याची चिन्हे दिसत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कभी खुशी, कभी गम’ अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पुणे- दौंड लोकलमुळे दौंड शहर पुणे शहराच्या समीप आले आहे. त्यामुळे लोकलची मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्युतीकरणावरील लोकलसाठी पाठपुरावा केल्यानंतर हे काम प्रगतीपथावर नेले आहे. त्यामुळे विद्युतीकरणाच्या निधीसाठी त्यांनी केंद्रीय पातळीवर प्रयत्न केला. त्यावेळी खासदार सुळे यांनी तत्कालीन मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करून निधी खेचून आणला. विद्युतीकरणानंतर डेमूची चाचणी घेतली. डेमू रूळावर आली. मात्र, अजूनही समस्यांचे अडथळे आहेत. लोकल पूर्ण क्षमतेने धावत नाही. दररोज पुण्यात रोजगार, शिक्षण, कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या ही 7 हजारांवर आहे. या प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

दौंडला पूर्वी असलेली (वाफेचे इंजिनची देखभाल) लोकोशेडची जागा आता पडीक होती. त्या जागेवर रेल्वे विभागाने एखादा प्रकल्प उभा करावा, अशी मागणी 2014 मध्ये पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी केली होती. पुणे विभागीय प्रबंधक यांच्याकडे केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून रेल्वे मंत्रालयातून मंजूर करून घेण्यात खासदार सुप्रिया सुळे यांचे योगदान आहे. दौंडचे लोकोशेड, विजेवर धावणाऱ्या 200 इंजिन दुरुस्तीची क्षमता, अत्याधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्तीसाठी लोकोशेड उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली होती. भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्‍शन कंपनीकडून तीन वर्षांपूर्वी काम सुरू झाले होते. दौंड रेल्वेस्थानकाजवळील 10 ते 12 हेक्‍टर जागेत हे काम होत असलेला हा लोकोशेड सोलापूर विभागातील पहिला, तर देशातील 24 व्या क्रमांकाचा आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी देशात तीन लोकोशेड उभारले आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर विद्युत इंजिनची संख्या निश्‍चितच वाढणार आहे. विजेवर धावणाऱ्या या इंजिनच्या दुरुस्तीसाठी सोयीस्कर जागा मिळावी म्हणून मध्य रेल्वेने लोकोशेडसाठी दौंडची निवड केली आहे. या ठिकाणी सहाशे ते एक हजार कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे.

दौंड शहरासह परिसराचा वाढता विस्तार पाहता येथील दोन महत्वाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. यात पुणे- दौंड मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी निधींची गरज आहे. हा निधी मिळाला असता तर या परिसराला चालना मिळाली असती. हे दोन महत्त्वाची कामे मार्गी लागल्यास भविष्यातील 25 वर्षांतील प्रश्‍न सुटणार आहेत.

इंजिन दुरुस्तीचे वेळापत्रक
प्राथमिक स्वरूपात तीन टप्प्यांवर इंजिन दुरुस्ती होते. शेडमधून इंजिन बाहेर पडल्यानंतर 90 दिवसांनी पहिला टप्पा, 180 दिवसानंतर दुसरा तर 270 दिवसांनंतर तिसऱ्यांदा दुरुस्ती होते. तसेच 45 दिवसांनंतर ट्रिप इन्स्पेक्‍शन होते. इंटरमिडीएट ओव्हर हॉलिंग प्रकारात साडेपाच ते साडेसहा वर्षे झालेल्या किंवा 12 लाख किलोमीटर धावलेल्या इंजिनची दुुरुस्ती होते. तर पीओएच पिरॉडोकली ओव्हर हॉलिंग प्रकारात बारा ते साडेबारा वर्षे झालेल्या अथवा 24 लाख किमी धावल्यावर दुरुस्ती होते. साधारणपणे एका इंजिनचे आयुर्मान 34 वर्षे, वजन 123 टन तर किंमत 10 ते 12 कोटी रुपये असते.

लोकोशेडची वैशिष्ट्ये
लोकोशेडमध्ये 200 इंजिन दुरुस्तीची क्षमता आहे. डब्ल्यूएजी 7 व 9 या शक्तिशाली प्रकारातल्या इंजिनची दुरुस्ती इथे होईल. त्यासाठी व्हीव्हीव्हीएफ (व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी ऊर्जेवर चांगल्या पद्धतीने इंजिन दुरुस्ती केली जाते. या शेडमध्ये केवळ 3 फ्रेज इंजिनाचीच दुरुस्ती होणार आहे.

दौंड शहराच्या दृष्टीने अर्थकसंकल्पात इलेक्‍ट्रीक लोकोशेडसाठी 17 कोटी 63 लाख 95 हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. दौंड- पुणे प्रवासदरम्यान प्रवास सुखकर करण्यासाठी सिग्नल इंटर मिडिएट लॉकसाठी 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हडपसर सॅटेलाईट टर्मिनलसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तीन ते चार दशकानंतर थोड्या प्रमाणात लक्ष दिले आहे. अजून काही समस्या आहेत. त्या पूर्ण होतील, अशी प्रवाशांना अपेक्षा आहे.
– विकास देशपांडे, सचिव, दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघ.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)