पुणे – दरमहिन्याला पीएमपीएमएलकडे दोन हजार तक्रारी

– 1 जुलै 2017 पासून आतापर्यंत 21 हजार 820 प्रवाशांकडून हेल्पलाईन नंबरवर संपर्क
– पीएमपीएमएलकडून 21 हजार 322 तक्रारींचे निराकरण
– नियोजित वेळेपेक्षा उशीरा गाडी येण्याच्या सर्वाधिक तक्रार

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (पीएमपीएमएल) बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पीएमपीकडून प्रवाशांना स्मार्ट सेवा देण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात असली तरी तक्रार करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. नियोजित वेळेपेक्षा उशीरा गाडी येणे, बसथांब्यावर गाडी न थांबताच पुढे जाणे, वाहकाचे प्रवाशांसोबत उद्धट वर्तन यासारख्या अनेक कारणांमुळे महिन्याला 2 हजार नागरीक पीएमपीकडे तक्रार करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या नियोजित वेळेपेक्षा उशीरा गाडी येण्याच्या आहेत.
पीएमपी ही शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा आहे. पीएमपीकडून नागरिकांना उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. नुकतेच महिलांसाठी “तेजस्विनी’ गाडी सुरू करण्यात आली. अल्पावधीत या गाडीला प्रतिसाद मिळाला. मात्र, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपी बसची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. पीएमपीएमएलने नागरिकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. या सेवेद्वारे 1 जुलै 2017 पासून आतापर्यंत 21 हजार 820 प्रवाशांनी विविध तक्रार नोंदविल्या आहेत. चालक, वाहकाद्वारे प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणे, बस वेळेवर न येणे, वाहकाकडून सुटे पैसे न देणे, स्थानकावर बस न थाबवणे अशा कारणांमुळे दर महिन्याला 2 हजारांवर तक्रार येत असल्याचे समोर आले आहे. प्रवासादरम्यान विविध अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागल्यामुळे प्रवाशांनी फोन करून, मोबाइल संदेश, ई-मेलद्वारे पीएमपीएल प्रशासनाकडे या तक्रारी केल्या आहेत. पीएमपी प्रशासनाकडून देखील नागरिकांच्या या तक्रारींची योग्य ती दखल घेऊन तातडीने त्याचे निराकरण केले जाते. पीएमपीएमएलकडे आलेल्या 21 हजार 820 तक्रारींपैकी 21 हजार 322 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
————-
– वाहक, चालकांना ट्रेनिंग
प्रवासादरम्यान वाहक, चालक यांच्याकडून प्रवाशांसोबत सुसंवाद ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. महिला, वृद्ध नागरीक, अंध-अपंग प्रवाशांच्या बसप्रवासासाठी सन्मानपूर्वक सेवा देण्यासाठी पीएमपीएल प्रशासन प्राधान्याने काम करणार असल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
——
– तक्रारींचे काही तासांत निराकरण
विभाग प्रमुखांकडून रुटवरील बसची माहिती घेऊन संबंधित चालक आणि वाहकाला सुनावणीसाठी नियंत्रण कक्षात बोलाविले जाते. प्रवाशांची तक्रार आणि चालक, वाहकांच्या बाजू ऐकून निकाल दिला जातो. तक्रारीची सत्यता जाणून घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पीएमपीकडे आलेल्या तक्रारींचे काही तासांत निराकरण करण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)