पुणे – थुंकीबहाद्दरांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर

पुणे – रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने धडाकेबाज कारवाई करत “हिरोगिरी’ दाखवली. परंतु, “दिव्याखाली अंधार’ म्हणतात तसा प्रकार यामध्ये आहे. महापालिकेच्या स्वतःच्या घरातच म्हणजे महापालिका भवनाच्या कोपऱ्या-कोपऱ्यात पान, मावा, तंबाखू खावून रोजरोसपणे पिचकाऱ्या मारल्या जातात. जुन्या इमारतीत तर हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेच, परंतु अतिशय चकाचक बांधलेल्या नव्या विस्तारित इमारतीतील ही कोपरे अशा पिचकाऱ्यांनी भरून गेली आहेत. केवळ भिंती, कोपरे नव्हे तर लिफ्टमध्येही अशा पिचकाऱ्या मारल्या आहेत. अशा थुंकीबहाद्दरांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून कारवाई केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांच्या खिशांची तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित केलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ स्पर्धेत नंबराची घसरण झाल्याने महापालिकेने वर्षाच्या सुरुवातीपासूनच आता कारवाई, जनजागृती यावर भर दिला आहे. त्यातून त्यांनी 2020 च्या स्पर्धेची तयारीही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या, कचरा जाळणाऱ्या, उघड्यावर लघवी आणि शौच करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

…तर दंडात्मक कारवाई
महापालिका भवनातील कारवाईदरम्यान जे लोक स्वतःहोऊन तंबाखू आणि गुटखा किंवा तत्सम पदार्थांच्या पुड्या काढून देत नाहीत, त्यांच्याकडे तपासणीनंतर खिशात पुड्या सापडल्या तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय तंबाखूजन्य पदार्थ खाऊन भवनात आणि परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन अधिकारी माधव जगताप यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here