पुणे – थापेबाजी करण्यात भाजप आघाडीवर – मोहन जोशी

पुणे – “पुण्याच्या विकासाच्या बाबतीत खोटी माहिती देऊन गिरीश बापट यांनी सातत्याने प्रचारात फेकुगिरी चालवली आहे. या प्रकारामुळे बापट हे छोटे मोदीच ठरले आहेत,’ अशी टीका आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी शुक्रवारी केली.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील पदयात्रेच्या समारोपात जोशी बोलत होते. पुण्याच्या विकासासाठी स्मार्ट सिटी मार्फत पुण्याला 60 हजार कोटी रुपये दिल्याचे बापट सांगतात; परंतु प्रत्यक्षात स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून जेमतेम 300 कोटी रुपयेच आले आहेत. अशा प्रकारे फेकुगिरी करणाऱ्या या छोट्या मोदीला पुणेकर या निवडणुकीत धडा शिकवतील, असे जोशी म्हणाले. वडगावशेरी विधानसभा मतदार संघात शुक्रवारी कळस-विश्रांतवाडी चौक येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. निरगुडी लोहगाव येथे ही यात्रा समाप्त झाली. या पदयात्रेत आमदार शरद रणपिसे, बापू पठारे, सुनील टिंगरे, सुनील मलके, संगीता देवकर, सतीश मस्के, रेखा टिंगरे, राजेंद्र शिरसाठ, किशोर विटकर, अमृता मस्के, हुलगेश चलवादी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बेरोजगारांची मोदी सरकारने फसवणूक केली
मागील निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केल्यामुळे तरुणांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती. परंतु, मागील पाच वर्षांचा मोदींचा अजब आणि प्रचारकी राज्य कारभार पाहिल्यानंतर, कोट्यवधी युवकांच्या पदरी पूर्ण निराशा आली असून, मोदी-शहांनी पकोडे तळण्याचा दिलेला सल्ला म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असंवेदनशील प्रकार असल्याची घणाघाती टीका, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी शुक्रवारी केली.

नोटबंदीमुळे आपल्या देशामध्ये मागील सुमारे पंचेचाळीस वर्षातील सर्वाधिक म्हणजेच 6.1% इतक्‍या मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारीचे म्हणजेच चटके कोट्यवधी युवकांना बसले असून, त्यामध्ये कष्टकरी महिलांचे प्रमाण तर 8.7 एवढे मोठे असल्याचेही शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. नोटबंदीनंतरच्या म्हणजेच 2017 या वर्षातील पहिल्या चार महिन्यांतच जवळपास 45 लाखांहून अधिक लोकांचा रोजगार बुडाल्याचा दावा शिंदे यांनी केला.

हे तर इम्रान खान आणि मोदींचे मॅचफिक्‍सिंग
नरेंद्र मोदी हे पुन्हा निवडून आले तर दोन्ही देशात शांततापूर्ण बोलणी होण्यास उपयोग होईल, असे विधान करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतातील लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेत थेट ढळळाढवळ केली आहे. यावरून त्यांनी मोदींशी “मॅचफिक्‍सींग’ सारखी “निवडणूक फिक्‍सींग’ केल्याचा आरोप माजी आमदार उल्हास पवार यांनी शुक्रवारी केला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना स्वतःच्या शपथविधीला आमंत्रित करायचे आणि निमंत्रण नसताना मनात लहर आली म्हणून, अचानकपणे पाकिस्तानमध्ये जाऊन, पाकच्या पंतप्रधानांना वाढदिवसाचा केकही भरवायचा, असे सारे उद्योग करूनही कॉंग्रेस पक्षावर दुगाण्या झाडायच्या, ही फसवी मोदीनीती आता जनतेच्या चांगलीच लक्षात आल्याची टीकाही पवार यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.