पुणे – तीन जणांवरील लाचखोरीचा फास आवळला

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई : पुणे शहरासह ग्रामीण पोलिसमधील तिघांना भोवली

पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस दलात दोन, तर ग्रामीण पोलिसामध्ये एक असे तीन यशस्वी सापळे गुरूवारी (दि.25) रचले. शहरतील वानवडी पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयातील आस्थापना विभागातील लिपिकासह शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकाला पकडण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भंगार व्यावसायिकाकडून पाच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या वानवडी पोलीस ठाण्यातील हवालदार आणि त्याच्या एका सहकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. निसार मेहमुद खान (वय 44) आणि मेहंदी अजगर शेख (वय 32, रा. आनंदनगर, हडपसर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील फिर्यादींचा आनंदनगर येथे भंगार खरेदीचा व्यवसाय आहे. आरोपी खान याने “चोरीचा माल खरेदी करत असल्याचे सांगून, दुकानावर कारवाई करण्याची धमकी दिली होती. तसेच दुकान सुरू ठेवण्यासाठी 15 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजारात हा “मॅटर’ निकाली काढण्यात आला. ठरलेली पाच हजार रूपये खासगी इसम आरोपी मेहंदी शेख याच्या मार्फत स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक अनिल बाबुराव कोळेकर (वय 54) यांनी तक्रारदाराविरूध्द कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे कोळेकर यांची तक्रार केली. त्यानंतर एसीबीने ही कारवाई केली.

दरम्यान, एसीबीच्या पथकाने गुरूवारी पुणे पोलीस आयुक्‍तालयातील आस्थापना शाखेतील वरिष्ठ लिपीक मनोज हरी काळे (वय 52) यांना एका सहायक पोलीस निरीक्षकाकडून 3 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे संपूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, पोलीस उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.