पुणे – तळजाईवरील सौरऊर्जा प्रकल्पाची निविदा रद्द

पार्किंग शेडच्या आडून पुढे हा प्रकल्प राबवण्याचा घाट

पुणे – तळजाई टेकडी येथे सौरऊर्जा प्रकल्पाची निविदा रद्द करून केवळ पार्किंग शेड उभारण्याची निविदा काढण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, पार्किंग शेडच्या आडून पुढे सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

तळजाई टेकडीवर 108 एकर परिसरात वन उद्यान विकसित करण्यात येत आहे. यापैकी काही क्षेत्रावर पार्किंगशेड उभारून त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, याठिकाणी वनउद्यानाचे आरक्षण असल्यामुळे तसेच या प्रकल्पासाठी कोणताही बेस नसल्याने हा प्रकल्प होऊ शकणार नसल्याचे तत्कालीन महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त शितल उगले यांनी निरीक्षण नोंदवत निविदा रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सौरऊर्जेची निविदाच रद्द करण्यात आली. मात्र, आता तेथे महापालिकेच्या भवन विभागाकडून केवळ पार्किंगसाठी शेड उभारण्याची निविदा काढण्यात आली आहे.
या ठिकाणी उभारलेल्या स्टेडियममुळे आणि फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी हे वाहनतळ विकसित करण्यात येणार होते. तसेच, येथील स्ट्रीट लाईटसाठी सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार होता. मात्र, हा प्रकल्प रद्द केला असून केवळ पार्किंग शेडच तयार केले जाणार आहे. पार्किंग शेड उभारल्यानंतर जागा उपलब्ध झाल्यामुळे हळूहळू सौरऊर्जेचा प्रकल्पही याठिकाणी आणण्याचा घाट घातला जात असून त्यामुळेच पार्किंग शेडची घाई केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

विरोधानंतरही पार्किंग शेड उभारणार
तळजाई टेकडीवर वाहनतळ उभारल्यास याठिकाणची झाडे तोडावी लागतील. त्यामुळे वाहनतळ उभारण्यास नगरसेवक सुभाष जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नितीन कदम आणि अर्जुनराव जानगवळी यांनी विरोध केला होता. तरीही येथे पार्किंग शेड बांधण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.