पुणे – तलाव बंद करण्याच्या नोटीसा

पावसाळ्यापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश


तलाव चाविणाऱ्या ठेकेदारांना नोटीसा


सोमवारपासून होणार तपासणी

पुणे – महापालिका आयुक्तांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरातील सर्व जलतरण तलाव पावसाळ्यापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून पालिकेचे तलाव चालविण्यास देण्यात आलेल्या ठेकेदारांना तातडीने तलाव बंद करण्याच्या नोटीस बजाविल्या आहेत. दरम्यान, नोटीसांनंतर तलाव बंद केले आहेत किंवा नाही याची तपासणी सोमवारपासून होणार असल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त अनिल मुळे यांनी स्पष्ट केले.

पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांकडून अनावश्‍यक पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सिमेंट रस्ते, वॉशिंग सेंटर तसेच जलतरण तलावांना पिण्याचे पाणी वापरू नयेत, असे आदेश काढले आहेत. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 31 जलतरण तलाव असून त्यातील 4 बंद आहेत; तर 27 सुरू आहेत. हे तलाव ठेकेदारांच्या माध्यमातून चालविले जातात. या सर्व ठेकेदारांना मालमत्ता व्यवस्थापन विभागाने नोटीस बजाविली असून तातडीने तलाव बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच तलावांना बोअरवेलचे पाणी वापरण्यात येत असले तरी असे तलावही बंद करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले. तसेच हे तलाव बंद करण्यासाठी ठेकेदारांना दिलेला वेळ कमी असल्याने या नोटीसची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले जाणार असून जलतरण तलाव सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले.

खासगी तलावांबाबत संभ्रम
एका बाजूला सार्वजनिक जलतरण तलावांना नोटीस बजाविण्यात आली असली तरी खासगी तलावांबाबत महापालिका प्रशासन अद्यापही संभ्रमावस्थेत आहे. आयुक्तांनी काढलेल्या लेखी आदेशात खासगी तलावांचा उल्लेख असला तरी त्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. शहरात सुमारे साडे तीनशेहून अधिक खासगी तलाव असून त्यांचे सर्वेक्षण करणे, नोटीस बजाविणे, ते बंद आहेत की नाही याची तपासणी करणे यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आयुक्तांशी पुन्हा चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×