पुणे : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंधांना मिळाली “दृष्टी’

“स्मार्ट’ काठीची वैशिष्ट्ये :
– रस्त्यावर अथवा इतरत्र चालताना दिशा कळणार
– आवाजाच्या माध्यमातून काठीला सूचना देता येणार
– यातील तंत्रज्ञानामुळे “डिस्क्राइब’ या एकाच शब्दाच्या उच्चाराने आजूबाजूच्या वस्तू, हालचाली यांची माहिती कळणार
– यातील उपकरणे एका काठीवरून दुसऱ्या काठीला जोडता येणे शक्‍य आहे
– अतिशय कमी किमतीत नागरिकांसाठी उपलब्ध होणार

गायत्री वाजपेयी

ओम पाटील, वरूण उमरेकर यांच्या प्रयत्नातून “स्मार्ट केन’ची निर्मिती
काठीच्या माध्यमातून खड्डे, गाड्या अथवा इतर अडथळ्यांची माहिती मिळणार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – अंध नागरिकांसाठी त्यांची काठी हा एक मोठा आधार असतो. मात्र अनेकदा ही काठी सोबत असूनही अंध व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. परंतु जर ही काठी केवळ आधार न राहाता, आवाजाच्या माध्यमातून ती त्यांची मार्गदर्शक बनली तेही अवघ्या काही हजार रुपयांमध्ये, तर? पुण्यातील विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (व्हीआयटी) विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या वापरातून “स्मार्ट केन’ विकसित करत ही किमया साध्य केली आहे.

ओम पाटील आणि वरूण उमरेकर हे व्हीआयटी महाविद्यालयात इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. अंध नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी तयार केलेल्या या काठीचे नुकतेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे आयोजित “राष्ट्रीय मानवरहित रोबोटिक्‍स’ स्पर्धेत प्रदर्शन करण्यात आले. या काठीच्या उपयुक्ततेबाबत प्रदर्शनात भेट देणाऱ्या अनेक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

याबाबत ओम म्हणाला, “अंध नागरिकांसाठी त्यांची काठी ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू असते. तिच्या सहाय्याने ते एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात. मात्र अनेकदा रस्त्यातील खड्डे, गाड्या अथवा इतर अडथळ्यांबाबत माहिती न मिळाल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. काही वेळेला इतर नागरिकांची मदतही घ्यावी लागते, मात्र प्रत्येकवेळी मदतीसाठी कोणी न कोणी उपलब्ध असेलच, असे नसते. अशावेळी त्या लोकांना स्वयंपूर्ण बनण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करतानाच ही कल्पना सूचली आणि मी व माझे सहकारी यावर काम करू लागलो.’

या काठीवर अल्टा सॉनिक आणि व्हिजन असे दोन सेन्सर बसविण्यात आले आहे. या सेन्सर्सच्या माध्यमातून त्या व्यक्तींच्या आसपास घडणाऱ्या घटनांच्या सूचना अंध व्यक्तींना मिळू शकतील. इतकेच नव्हे, तर काठीवर कॅमेरादेखील बसविण्यात आला आहे. या कॅमेराच्या माध्यमातून जवळपासच्या परिसरातील वस्तू कॅप्चर करून त्यांच्याबाबतची माहिती व्हिजन सेन्सरच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचविली जाईल. ही माहिती आवाजाच्या माध्यमातून पोहोचविली जाणार असून, त्यासाठी या काठीबरोबर ब्लुटुथ डिव्हाइसदेखील असणार आहे, असेही त्यांने सांगितले.

सद्य स्थितीत हा प्रकल्प संस्थात्मक पातळीवर असून, विविध वैज्ञानिक प्रदर्शनांच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. समाजातील जास्तीत जास्त अंध नागरिकांपर्यंत ही वस्तू पोहोचून, तिचा फायदा सर्वांना व्हावा, यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू असल्याचे ओम याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)