पुणे – “डिजिलॉकर’ म्हंजी काय रं भाऊ?

– वाहतूक पोलिसांना माहितीच नाही : लायसन्स तपासणीवेळी वाद
– पुरेशी माहिती नसल्याने वाहतूक पोलीस संभ्रमात
– वाहतूक पोलिसांसाठी कार्यशाळेचे आयोजन

पुणे – डिजिटल लॉकरच्या माध्यमातून नागरिकांना सॉफ्ट कॉपी स्वरुपात कागदपत्रे हाताळण्याची सोय केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिली. याबाबतीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने देखील एक पाऊल पुढे टाकत 2006 पासूनचे लायसन्स, आरसी बुक डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करुन दिली आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार वाहन अडविल्यास डिजिलॉकरमधील कागदपत्रे पोलिसांना दाखवणे अधिकृत आहे. मात्र, यासंदर्भात वाहतूक पोलिसांना पुरेशी माहिती नाही. यामुळे वाहन चालकांनी डिजिलॉकरमधील लायसन्स, आरसी दाखविल्यानंतर पोलीस ते मान्य करीत नसल्याने वाहन चालक आणि पोलिसांत वाद होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी वाहतूक पोलीस करतात. त्यानुसार चालकांनी ती कागदपत्रे दाखवणे बंधनकारक आहे. मात्र, शासनाने डिजिटल लॉकर उपलब्ध करुन दिले आहे. याअंतर्गत नागरिकांना त्यांची महत्वाची कागदपत्रे या ऍपमध्ये साठवून ठेवता येऊ शकतात. याबाबतीत आरटीओने 2006 पासूनची लायसन्य, आरसीबूक या ऍपमध्ये उपलब्ध करुन दिली आहेत. या ऍपचा वापर करुन आता सर्वसामान्य नागरिकांना आरटीओसंबंधित कागदपत्रे ऍपमध्ये उपलब्ध होणार आहेत. तसेच परिपत्रकानुसार या ऍपमधील कागदपत्रे अधिकृत समजली जाणार आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांमध्ये याबाबत जागृती नसल्याने तेच संभ्रमात आहेत. एखाद्या वाहनचालकाने डिजिलॉकरमधील लायसन्स दाखविल्यास ते ग्राह्य धरायचे, की नाही? याबाबत वाहतूक पोलीस अनभिज्ञ आहेत. तसेच त्यांच्याकडून वाहनचालकांना मूळ लायसन्सची मागणी केली जाते. यामुळे आरटीओने पुढाकार घेऊन नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांना पुरेशी माहिती नसल्याने कटकट वाढली आहे.
——————–
आधार लिंकिंगची कटकट
डिजिलॉकर या ऍपबरोबरच एम-परिवहन ऍपच्या माध्यमातून आरटीओशी संबंधित कागपत्रे मोबाइलमध्ये बाळगणे सोयीचे झाले आहे. मात्र, या ऍपवर मोबाइल क्रमांक आधारशी लिंक असल्याशिवाय खाते उघडता येत नाही. मोबाइल आधारशी लिंक असल्यास सहजपणे हे खाते उघडता येते.
———-
– वाहतूक पोलीस अशी करू शकतात तपासणी
डिजिलॉकर हे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाशी जोडले गेले असल्याने ऍपवरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत, अशा सूचना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने दिल्या आहेत. वाहतूक पोलिसांना ऍपवरील कागदपत्रांची तपासणी करायची असेल, तर ऍपमध्ये क्‍यूआर कोडची सुविधा आहे. त्या कोडचा वापर करून वाहतूक पोलीस त्यांच्याकडे असलेल्या ई-चलन या ऍपमधून तो कोड स्कॅन करू शकतात. यानंतर चालकांचे नाव, पत्ता, मोबाइल, क्रमांक, जन्म तारीख, वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चॅसी क्रमांक आदी बाबीची सत्यता पडताळता येते. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांकडे असलेल्या ई-चलन या ऍपवरच फक्त हा कोड स्कॅन केला जाऊ शकतो. यामुळे डिजिलॉकरवरील कागदपत्रे दाखवून फसवणूक करण्यास वाव नाही.
————
कोट
डिजिलॉकरबाबत तसेच एम-परिवहन ऍपवरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत. एखाद्या वाहन चालकांबाबत शंका आल्यास त्याच्या कागदपत्राची सत्यता कशी पडताळावी, याबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक पोलिसांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. सध्या व्हॉटसऍप रुम आणि वायलेसच्या माध्यमातून डिजिलॉकर आणि एम-परिवहन ऍपबाबत पोलिसांना माहिती दिली जात आहे. त्यामुळे कार्यशाळेनंतर शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत डिजिलॉकरची माहिती पोहोचलेली असेल.
– अशोक मोराळे, वाहतूक पोलीस उपायुक्त, पुणे
————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)