पुणे – …डायरेक्‍ट ‘302’!

गुन्हेगारांमध्ये पुन्हा वाढली कोयत्याची “क्रेझ’


बदला घेण्यासाठी क्रूरपणानेही गाठला कळस


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खुनाच्या प्रयत्नापेक्षा खुनाच्या गुन्ह्यांचा टक्‍का वाढला

– संजय कडू

पुणे – “शेती विकू नये’ असा चांगला संदेश नुकतच्या झळकलेल्या एका चित्रपटातून दिला गेला असला, तरी चित्रपटातील हिंसक दृश्‍यांचाच मोठा परिणाम गुन्हेगार व गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांवर झाला आहे. या चित्रपटानंतर पिस्तूल/देशी कट्टा बाळगण्याची “क्रेझ’ एकदम कमी झाली असून गुन्हेगार व त्यांचे सहकारी पुन्हा कोयत्याकडे वळले आहेत. इतकेच नव्हे, तर प्रतिस्पर्ध्याला जिवंत संपवूनच टाकण्याकडे त्यांचा कल आहे. यातच गुन्हा करताना क्रूरतेचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे खुनाच्या प्रयत्नापेक्षा खुनाच्या गुन्ह्यांची सरासरी तब्बल तीन टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती पोलीस व गुन्हेगारी क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

पोलिसांनाही हाताळण्याचे मिळतेय प्रशिक्षण
एखादा गुन्हा केल्यानंतर कारवाईचे चक्रव्यूह कसे भेदायचे, याचे सहज प्रशिक्षण अल्पवयीन व तरुण गुन्हेगारांना मिळू लागले आहे. खून किंवा खुनाचा प्रयत्न केल्यावर पोलीस व वकिलांना कसे हाताळायचे, हे त्यांना समजू लागले आहे. साक्षीदारच पुढे येणार नाही याचीही तजवीज गुन्हेगारांकडून केली जात आहे. मोठ्या गुन्हेगारांकडून ही सर्व माहिती व प्रशिक्षण सहज त्यांना दिले जात आहे. यामुळे नव्याने गुन्हेगारीत दाखल झालेले तरुण व अल्पवयीन “भाई’ बेडर झाले आहेत. त्यांना पोलीस व कायद्याची कोणतीच भीती उरली नाही. कायद्यातील काही पळवाटांचा वापर करुन गॅंगस्टरही त्यांच्या टोळ्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांना समाविष्ट करुन घेऊ लागले आहेत.

खून केल्यावर जामीन, तर खुनाचा प्रयत्न केल्यावर शिक्षा
एखाद्याच्या खुनाचा प्रयत्न केल्यावर संबंधित फिर्यादी साक्ष देण्यासाठी जिवंत असतो. त्याला सहजा-सहजी “मॅनेज’ करता येत नाही. त्याच्या उपचाराचा खर्च आणि पैसे दिल्यावरही सात वर्षांची शिक्षा ठरलेलीच असते. मात्र खून केला, तर समोरचा व्यक्ती साक्ष देण्यास जिवंतच राहत नाही. तसेच दहशतीमुळे इतर साक्षीदारही पुढे येत नाही. पोलिसांनी पकडले, तर सहा महिन्यांत जामिनावर सुटका होते. यामुळे “समोरच्या व्यक्तीस जिवंत ठेवण्यापेक्षा त्याला जीवे ठार मारलेलेच बरे. जामिनावर सुटल्यावर दहशतीच्या बळावर हप्ते गोळा करता येतात’ असा चुकीचा संदेश नव्याने गुन्हेगारीत दाखल झालेल्यांमध्ये पसरला आहे. याचाच परिणाम म्हणून खुनाच्या घटना वाढल्या आहेत.

जानेवारी 2019 च्या खून प्रकरणांत कोयत्याचा आकडा सर्वाधिक
गुन्हेगारांमध्ये पिस्तूल व देशी कट्ट्याची मोठी “क्रेझ’ होती. यासाठी उत्तरप्रदेश व बिहारमधून चोरी-छुप्या पद्धतीने शस्त्रांची आवक केली जात होती. पोलिसांच्या अनेक कारवायांमध्ये “क्रेझ’ म्हणून तसेच गुन्ह्यातील वापरासाठी देशी कट्टे बाळगणारे पकडले जात होते. मात्र, एकट्या 2019 च्या जानेवारीत खुनाच्या घडलेल्या 12 घटना पाहिल्या असता, यातील बहुतांश घटनांमध्ये आरोपींनी कोयत्याचा वापर केला आहे. चित्रपटात ज्या प्रमाणे सपासप वार करतानाची दृश्‍य दाखवली जात आहेत, त्याचप्रमाणे गुन्हेगारांनी वार करुन खून केले आहेत. यामुळे चित्रपटातील हिंसक दृश्‍यांचा परिणाम तरुणांवर व गुन्हेगारांवर झाल्याचे दिसते, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.

गुन्हेगार तयार झाल्यानंतर कारवाईचा धडाका लावण्यापेक्षा गुन्हेगार तयार होऊच नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. समाजामध्ये पोलिसांची एक आदरयुक्‍त भीती निर्माण झाली पाहिजे. गुन्हेगार भला तो राजकीय असो, त्याच्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी पोलीस दलाने उभे राहिले पाहिजे. गुन्हेगार तयार होऊ नयेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा किंवा व्याख्यानांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत.
– उदय जगताप, सामाजिक कार्यकर्ता.


कोणत्याही प्रकार नकार पचविण्याची मानसिकता सध्याच्या पिढीमध्ये कमी झालेली दिसते. यातच कायदा तोडणे म्हणजे “हिरोगिरी’ असे वाटू लागले आहे. यामुळे सिग्नल तोडणे, रॉंग साइड वाहन चालविणे, ट्रिपलसीट जाणे इथपर्यंतच मर्यादित न राहता इतर गंभीर गुन्ह्यांकडेही तरुणाई वळत आहे. यातच समाजातील वातावरण लक्षात घेता मानसिक स्थैर्य व धैर्य हरवून बसलेली मुले एकत्र येतात. या एकत्र येण्यातून ते जे काही करतात त्याचा समाजावर मोठा परिणाम होता. यातच चित्रपट व इतर माध्यमांतून गुन्हेगारीच्या घटना ज्या पद्धतीने खोलवर दाखवल्या जातात, त्याचाही मोठा मानसिक परिणाम 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर होतो.
– शरद आखेगावकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)