पुणे – टेबल, खुर्च्या टाकून बूथ मांडणे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडले महागात

पुणे – रस्त्याच्या कडेला टेबले आणि खुर्च्या टाकून बुथ मांडणे सर्वच पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले. या टेबलांच्या आजूबाजूला नागरिकांनी गर्दी केल्याने वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती, यासंदर्भात काही नागरिक आणि वाहनचालकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन पोलिसांनी रस्त्याच्या कडेला मांडलेले बुथ हटविण्याच्या सूचना संबधित कार्यकर्त्यांना दिल्या.

वडगांवशेरी, खराडी, सोमनाथनगर, चंदननगर येथील बहुतांशी मतदान केंद्राच्या बाहेरील रस्ते अरुंद आहेत. चंदननगर येथील तुकाराम पठारे विद्यालय, वडगांवशेरी येथील स्टेला मेरीज शाळा, खराडी येथील सुंदरबाई मराठे शाळा, सोमनाथनगर येथील सोमनाथ विद्यालय आणि गणेशनगर येथील शिवराज विद्यालय या शाळांच्या मतदान केंद्राच्या बाहेरील रस्ते खूपच अरुंद आहेत. वास्तविक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेरील रस्ते बंद करण्याचा नियम आहे.

मात्र; या सर्व मतदान केंद्राच्या शाळा या रहिवाशी भागातील आहेत. त्यामुळे हे रस्ते वाहतूकीसाठी बंद करता येत नाहीत. त्याचाच फायदा घेऊन सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन दोन टेबले, पाच ते सहा खुर्च्या टाकून हे रस्ते बंद केले होते. त्यातच या टेबलांच्या भोवती स्लिपा घेण्यासाठी मतदारांनी गर्दी केल्याने या वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली होती, त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात पोलीसांकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन पोलीसांनी या कार्यकर्त्यांना टेबले हटविण्याची आणि एका बूथवर एकच टेबल आणि केवळ दोन खुर्च्या ठेवण्याचे आदेश दिले, त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.