पुणे – झेंडू, बिजली आणि गुलछडीची चलती

गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर आवक वाढली

पुणे – साडेतीन मुहुर्तांपैकी संपूर्ण एक मुहुर्त असलेला गुढीपाडवा येत्या शनिवारी (दि. 6) आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील फुलबाजार बहरला आहे. शहरासह जिल्ह्यातून विविध प्रकारची फुले मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहेत. मागणीही मोठी असल्याने कटफ्लॉवर वगळता सर्व फुलांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढले आहेत.

पूजेसाठी झेंडू, बिजली, गुलछडी आदी फुलांना मागणी असल्याचे सांगून व्यापारी सागर भोसले म्हणाले, झेंडूमध्ये अष्टगंधा आणि गावरान लालला सर्वाधिक मागणी आहे. वातावरणातील बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलछडीची निम्म्याहून कमी आवक होत आहे. सणामुळे मागणी वाढल्याने त्याच्या भावातही वाढ झाली आहे. सणावेळी केसांमध्ये लावण्यासाठी महिलावर्गाकडून गजऱ्याला पसंती मिळते. त्यासाठी लागणाऱ्या मोगरा आणि कागड्याचे भावही वीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

बाजारात दाखल होणाऱ्या मालाचा दर्जा खराब असल्याचे सांगताना अखिल फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर म्हणाले, पाडव्याला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसांपासून माल राखून ठेवला आहे. मात्र, त्याला प्रमाणापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यामुळे बाजारात दाखल होणाऱ्या मालापैकी 25 ते 30 टक्‍के माल खराब दर्जाचा आहे. तरीही मागणी असल्याने त्या फुलांना चांगला भाव मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.