पुणे – जेधे चौकात ‘पावती’पुरतीच कारवाई

पुणे – स्वारगेट चौकात (केशवराव जेधे चौक) बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे अनेक महिन्यांनंतर जेधे चौकाने मोकळा श्‍वास घेतला असून, वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. वाहतूक पोलिसांनी थेट रिक्षाला जॅमर लावल्यामुळे रिक्षाचालकही गोंधळले असून, अशाप्रकारची मोठी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.

शहराचा मध्यवर्ती भाग असलेला स्वारगेट चौक परिसरात पीएमपी आणि एसटी स्थानक आहे. तसेच कात्रज, टिळक रोड, सिंहगड रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरून येणारी वाहने या चौकात येत असल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, पादचारीही मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांना घेण्यासाठी सर्वच मार्गावरील रिक्षा मोठ्या संख्येने असतात. परंतु, प्रवासी मिळविण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला या रिक्षा उभ्या केल्या जातात. याबाबत रिक्षाचालकांना वाहतूक विभागाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या. परंतु, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून रिक्षाचालक नो-पार्किंगमध्ये आणि रस्त्याच्या दोन्हीबाजूला रिक्षा उभी करतच होते. त्यामुळे या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला, अशी माहिती स्वारगेट वाहतूक विभागाचे निरीक्षक प्रभाकर ढगे यांनी दिली.

ई-चलनद्वारे 13 हजार 800 रुपयांचा दंड
रिक्षा स्टॅंड सोडून अन्य ठिकाणी उभ्या असणाऱ्या, नो पार्किंग, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभ्या केलेल्या 96 रिक्षांना बुधवारी दुपारी जॅमर लावले. यापैकी 75 रिक्षाचालकांकडून ई-चलनद्वारे 13 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. तर उर्वरीत 21 रिक्षाचालकांकडे एटीएम कार्ड नसल्याने वाहनांवर दंड चढविण्यात आला. तसेच, या रिक्षांना सहा तासांपेक्षा जास्त काळ थांबवून ठेवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या चौकातील बेशिस्त रिक्षाचालकांवर सुरू केलेली कारवाई सुरूच राहणार असून, मागील आठ दिवसांत 400 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभाकर ढगे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here