पुणे – जिल्ह्यात एकूण 73,69,141 मतदार

संख्या वाढली : चिंचवडमध्ये सर्वाधिक नोंद

पुणे – शहर आणि जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघांतील मतदारांची संख्या वाढली आहे. आता एकूण मतदारांची संख्या 73 लाख 69 हजार 141 झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदार हे चिंचवड विधानसभा मतदार संघात असून, 4 लाख 77 हजार 40 झाली आहे. जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने वेळोवेळी घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे 1 लाख 89 हजार 876 मतदार वाढले आहेत.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार दुबार आणि मयत नावे वगळून नवीन यादी तयार करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, निवडणूक आयोग यांच्यातर्फे नवमतदारांसाठी नावनोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यानुसार पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी हडपसर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 4 लाख 66 हजार 124 मतदार झाले आहेत. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघांपैकी शिरुर हा सर्वांत जास्त मतदार असलेला मतदार संघ ठरला आहे. या मतदार संघात 3 लाख 57 हजार 624 मतदारांची नोंदणी झाली आहे.

आंबेगाव विधानसभा मतदार संघ हा जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेला मतदार संघ असून, या ठिकाणी 2 लाख 76 हजार 941 मतदार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.