पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पाळणाघर

अंगणवाडी सेविकांची नेमणूक : अत्यावश्‍यक सुविधांची संख्या वाढविली

पुणे – मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर अत्यावश्‍यक किमान सुविधांची संख्या वाढविली आहे. यामध्ये मेडिकल किट, मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत आणि लहान मुलांसाठी पाळणाघर या सुविधा यंदा मतदान केंद्रावर नव्याने असणार आहे. मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांकडील लहान मुले काही वेळ सांभाळण्यासाठी अंगणवाडी सेविकेची, आशा स्वयंसेविका तसेच शाळांमधील महिला शिपाई यांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील 7 हजार 903 मतदान केंद्रांवर अंगणवाडी सेविका नेमण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे.

मागील निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुमारे 7 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यात वाढ करून 15 प्रकारच्या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या विषयीच्या सूचना संबंधित प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना दिल्या आहेत.

अंगणवाडी सेविका नेमण्याचे आव्हान
महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी एक प्रशिक्षित सहायक या मुलांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात येणार आहे. जिल्ह्यात 7 हजार 903 मतदान केंद्र आहेत. तर ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांची संख्या सुमारे 4 हजार 300 आहे. त्यामुळे सुमारे उर्वरित सुमारे 3 हजार 600 मतदान केंद्रांवर अंगणवाडी सेविका नेमण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित महिला मिळण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. पुणे शहरातील मतदान केंद्रांवर आशा वर्कर अथवा महानगरपालिकेच्या शाळांमधील महिला शिपाई यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेकडून माहिती मागविली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

मतदान केंद्रावर वैद्यकीय सहायक
नव्याने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहायक उपलब्ध असणार आहे. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता, सावलीसाठी मंडप टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.