नागरिकांना मनस्ताप
खरेदी-विक्रीच्या कामांचा खोळंबा
नारायणगाव – नारायणगाव परिसरात गेली 20 दिवसांपासून स्टॅम्प (मुद्रांक) परवाने नूतनीकरण न झाल्यामुळे स्टॅम्प अभावी कर्ज प्रकरणे, तारण, नूतनीकरण अशी महत्त्वाची कामे रखडली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालय व परवानेधारक यांच्यातील समन्वयाअभावी परवण्याच्या नूतनीकारणासाठी विलंब होत आहे.
नारायणगाव येथे दुय्यम निबंधक कार्यालय आहे. त्याअंतर्गत सुमारे 22 पेक्षा जास्त महत्त्वाची गावे येतात. दरवर्षी नारायणगाव कार्यालयाचे अंतर्गत असणाऱ्या 9 परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण केले जातात. 31 मार्चपर्यंत परवाने दुय्यम निबंधक कार्यालयात जमा करावे लागतात.
त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परवाने पुणे येथील जिल्हा कार्यालयातून नूतनीकरण होऊन स्टॅम्प विक्री सुरू केली जाते. मार्चच्या शेवटी जमीन, शेती, घर देणे-घेणे, जुने कर्ज भरून नवीन कर्ज घेणे, सोनेतारण, बॅंक कर्ज, तारण असे विविध कामांसाठी स्टॅम्प पेपर मुद्रांक म्हणून महत्त्वाचे असतात. परंतु नारायणगाव दुय्यम कार्यालयांतर्गत असणाऱ्या 9 पैकी 8 परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण न झाल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्टॅम्प घेण्यासाठी परिसरातील अनेक गावांतून नागरिक नारायणगाव येथे येत असतात.
नारायणगावात सात, आळेफाटा एक व बेल्हा येथे एक असे 9 परवानाधारक मुद्रांक विक्रेते आहेत. त्यापैकी एका मुद्रांक विक्रेत्याने या वर्षी परवाना नूतनी कारणासाठी अर्ज दिला नसल्याने सध्या 8 परवाने धारक आहेत. गेली 24 दिवस परवाने नूतनीकरण होऊन न मिळाल्याने परवाना धारकांमध्ये नाराजी आहे.
या बाबत नारायणगाव कार्यालयातील दुय्यम निबंधक दिनकर देशमुख यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, नूतनीकरणासाठी परवाने जिल्हा कार्यालयात दिले आहेत. नूतनीकारणांची मुदत मार्च 2018 पर्यंत 1 वर्ष होती. ती यंदाच्या एप्रिल 2018 पासून 3 वर्षांसाठी केली जाणार असल्याने विलंब झाला आहे. परवाने मंजूर झाले असून ते आणण्यासाठी पुण्याला कर्मचारी पाठविणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा