पुणे जिल्हा : नादुरुस्त एसटीमुळे प्रवाशांचा खोळंबा

एकाच दिवशी तीन बस रस्त्यातच नादुरूस्त


कडाक्‍याच्या उन्हात ताटकळत


आंबेगाव तालुक्‍यात प्रवासी, विद्यार्थ्यांना मनस्ताप

मंचर – मंचर परिसरात एसटी बस नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्‍त केली. जुन्या एसटी गाड्यांची झालेली दयनीय अवस्था, त्यामध्ये खिडक्‍यांना काचा नसणे, बसण्यासाठी असलेल्या आसनांची दुरवस्था, पत्रे उचकटलेले यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहे. ऐन लग्नसराई आणि परीक्षेच्या हंगामात एसटी बस बंद पडण्याचे प्रमाण आंबेगाव तालुक्‍यात वाढले आहे. रविवारी (दि. 22) मंचर परिसरात तीन एसटी गाड्या नादुरूस्त झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हात ताटकळत उभे राहून दुसऱ्या एसटी बसला हात करून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

आंबेगाव तालुक्‍यात एसटीचे आगार नसल्याने येथील प्रवाशांना राजगुरूनगर, नारायणगाव, एसटी आगारावर अवलंबून रहावे लागत आहे.सद्यस्थितीत लग्नसराई आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने मंचर आणि घोडेगाव बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. रविवारी मंचरचा आठवडे बाजार आणि विवाहाचे मुहूर्त असल्याने लग्नसराईला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. राजगुरूनगर एसटी आगाराच्या दोन एसटी बस अनुक्रमे क्‍लच फेल आणि एअर पाईप लिक झाल्याने एसटी बस नादुरूस्त होऊन रस्त्यातच बंद पडल्या.

तसेच शिवाजीनगर एसटी आगाराची पुणे-भीमाशंकर एसटी बसचा जॉईट तुटल्याने रस्त्यालगतच बंद पडली. त्यामुळे संबंधित एसटी बसमधील प्रवाशांना ऐन उन्हात बंद पडलेल्या एसटी गाड्यांचा मनस्ताप सहन करावा लागला. एसटी बस बंद पडल्याने त्या बसमधील प्रवाशांना मात्र, इतर एसटी बसमधून जाण्यासाठी हात करावा लागला. परंतु येणाऱ्या प्रवाशांनी एसटी बस खचाखच भरल्याने त्या थांबत नव्हत्या. अखेर शेवटी प्रवाशांनी रस्त्यावर मध्यभागी उभे राहून एसटी एसटी बसला थांबण्यास भाग पाडले.त्या बसमध्ये काही प्रवाशी तर दुसऱ्या एसटी गाड्यात काही प्रवाशी कसेबसे दाटीवाटीने उभे राहुन इच्छितस्थळी पोहचले.

लग्न सराई, यात्रांचा हंगाम आणि परीक्षांचा कालावधी सुरू असताना एसटी बस सुस्थितीत असणे गरजेचे आहे. एसटी चालक यांनी अनेकवेळा एसटीच्या व्हिव्हीलवर शेरा मारून एसटी बसच्या मार्गक्रमणात होणाऱ्या अडचणी लेखी लिहुनही मात्र वर्कशॉपमध्ये शेऱ्याकडे दुर्लक्ष केले जाते.त्यामुळे एसटी बस रस्त्यालगतच बंद पडून एक प्रकारे एसटी महामंडळाची बदनामी पर्यायाने प्रवाशांचे हाल होतात. याकडे मात्र एसटीच्या अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचा आरोप उद्योजक अजय घुले यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)