पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यपदी बाळासाहेब औटी

आळेफाटा- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब सिताराम औटी यांची महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्यपदी दुसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे पत्र जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहे. औटी हे राजुरी (ता. जुन्नर) येथील राहणारे असून गेली 25 वर्षे ग्राहक पंचायतीचे कार्य करत आहेत. ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी रचनात्मक आंदोलने, ग्राहक कार्यकर्ता निर्माण व्हावा, यासाठी कार्यशाळा, ग्राहक मेळावे आयोजित करून ग्राहक प्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाच्या ग्राहक संरक्षण परिषदेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
औटी यांची यापूर्वी 2014 साली याच परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीपासून आजवरच्या 4 वर्षाच्या काळात वीज, आरोग्य, अन्न आणि औषध, वजनमाप, जमीन महसूल, प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) तसेच गॅस ग्राहक यासंबंधी व्यापक जनहिताचे प्रश्न परिषदेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी औटी यांनी प्रयत्न केले होते. तसेच विशेष म्हणजे वाहतुकीच्या नावाखाली होणारी गॅसधारकांची फसवणूक टाळण्यासाठी गॅस वितरकांची संख्या वाढल्याने सन 2008 चे वाहतुकीचे दरपत्रक औटी यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी यांनी रद्द केले. औटी यांनी यापूर्वी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्य म्हणूनही यापूर्वी काम पाहिले आहे. तसेच ग्राहक संरक्षणाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आहे.
या नियुक्तीमुळे औटी यांची विविध क्षेञातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे बाळासाहेब औटी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)