खळद- येथील सेंट जोसेफ इंग्लिश मेडियम शाळेच्या अवाजवी फी व शाळेच्या कामकाजाबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, असे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांना पत्राद्वारे दिलेले असताना महिना होऊनही त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
याबाबत पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली व आता दोन दिवसांत यावर कार्यवाही झाली नाही तर शेकडो पालकांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा पालक संघाच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
शाळेने सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी पालक संघातील सदस्यांना अंधारात ठेवून त्यांच्या मान्यतेशिवाय फी वाढ केली आहे. यामुळे यास पालक वर्गातून तसेच पालक- शिक्षक संघातून कडाडून विरोध होत असून शाळेच्या कारभाराविषयी शिक्षण उपसंचालक कार्यालयात लेखी तक्रार केली आहे.
त्यानुसार शाळा शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार काम करीत आहे का नाही? याबाबतची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक टेमकर यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत व शिक्षण अधिकाऱ्यांनी पुरंदरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हे पत्र त्यांना 26 मार्च रोजी मिळाले आहे. यानुसार पालकांनी गटशिक्षणाधिकारी लोंढे यांची 28 मार्च व 2 एप्रिल रोजी भेट घेतली. त्यावेळी “6 एप्रिल रोजी शाळेची चौकशी करू’, असे लोंढे यांनी सांगितले.
मात्र सांगितलेल्या दिवशी कसलीही चौकशी न झाल्याने पालकांनी पुन्हा 16 एप्रिल रोजी भेट घेतल्यावर असे चौकशी आदेशाचे पत्रच मिळाले नसल्याचे लोंढे यांनी सांगितले. त्यावर पालकांनी लोंढे यांच्या कार्यालयाला मिळालेल्या पत्राची पोहोच दाखविल्यावर “पाच दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त होईल’, असे लोंढे यांनी आश्वासन दिले. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पालकांनी प्रसार माध्यमांकडे धाव घेत पुरंदरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाल टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा