तरुणीचे अपहरण करून विनयभंगाचा प्रकार
घटनेसंदर्भात गोपनीयता बाळगल्याचे कारण काय?
वर्णनावरून आरोपीचा शोध घेणे सुरू
पुणे – तेवीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा एका सहा आसनी रिक्षा चालकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणीने धाडस दाखवत त्या रिक्षा चालकास विरोध केला. दरम्यान, या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधितावर विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षाचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, सिंहगड पोलिसांनी या घटनेसंदर्भात मोठी गोपनीयता बाळगल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.
फिर्यादी तरुणी धायरी परिसरात राहते. ती पुणे स्टेशन परिसरात एका क्लासला जाते. ती शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्वारगेट येथून घरी जाण्यासाठी सहा आसनी रिक्षात बसली होती. त्यावेळी तिच्यासोबत एक महिला व एक पुरुष असे सहप्रवासी होते. ते दोघेही हिंगणे परिसरात उतरले. त्यामुळे पुढे जाताना रिक्षात तरुणी एकटीच होती. चालकाने काम असल्याचे सांगत हिंगणे परिसरातील कॅनॉल रस्त्याने रिक्षा घेतली. त्यानंतर गोयल गंगा येथील चौकातून पुन्हा सिंहगड रस्त्याला तो आला. धायरीकडे रिक्षा न नेता त्याने रिक्षा मुंबई-बंगळुरू महामार्गावर वळविली. तरुणीला शंका आल्यामुळे, तिने चालकास “इकडे कुठे जाताय, मला धायरीत सोडा,’ असे सांगितले. त्यावेळी चालकाने “माझे इकडे काम आहे. दहा मिनिटांत तुला सोडतो,’ असे म्हणत रिक्षा नऱ्हेच्या दिशेने नेली. येथील जिमजवळ तरुणीने त्या रिक्षा चालकास प्रतिकार करत रिक्षा थांबविण्यास सांगितली. त्यावेळी चालकाने चेहऱ्यावरील तरुणीचा विनयभंग केला. त्यावेळी तिने प्रतिकार करत चालत्या रिक्षातून उडी मारली. यानंतर रिक्षाचालक पसार झाला. त्यानंतर तिने मित्राला फोन करून बोलावून घेतले.
भेदरलेल्या तरुणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, या प्रकणात संबंधित रिक्षाचा नंबर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र, तरुणीने जे आरोपीचे वर्णन दिले आहे, त्यावरून पोलीस त्याचा शोध घेत असल्यावे तपास अधिकारी महिला फौजदार आशा गायकवाड यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा