पुणे – खून झालेल्या शेतकऱ्याचा क्‍लेम नाकारणे पडले महागात

क्‍लेम, व्याज, नुकसान भरपाई देण्याचा विमा कंपनीला आदेश

पुणे – खून झालेल्या शेतकऱ्याचा क्‍लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीच्याविरोधात ग्राहक मंचाने निकाल दिला आहे. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना विम्याच्या दाव्याची रक्‍कम 2 लाख रुपये देण्यात यावेत. त्या रकमेवर शेतकऱ्याचा मृत्यू झालेल्या तारखेपासून म्हणजे दि. 6 सप्टेंबर 2016 पासून वार्षिक सात टक्‍के दराने व्याज द्यावे. त्याचबरोबर नुकसान भरपाई आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पंचवीस हजार रुपये देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

याबाबत संगीता तुकाराम बर्वे (रा. कोळवण, ता. मुळशी) यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत व्यवस्थापक, शिवाजीनगर अणि मुळशी तालुका कृषी अधिकारी यांच्या विरोधात दि. 25 सप्टेंबर 2018 रोजी अतिरिक्‍त जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. संगीता यांचे पती तुकाराम विठ्ठल बर्वे हे शेतकरी होते. तक्रारदारांचा अज्ञात व्यक्‍तीने दि. 6 सप्टेंबर 2016 रोजी खून केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. संगीता यांनी आवश्‍यक कागदपत्रांसह दावा दाखल केला. विमा कंपनीने तुकाराम यांचे निधन अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झाले आहे, असे सांगत क्‍लेम नाकारला. त्यामुळे संगीता यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.

तुकाराम यांचा मृत्यू नैसर्गिक नाही. अंमली पदार्थाच्या अंमलाखाली त्यांनी मृत्यूला आमंत्रण दिल्याचे दिसते. त्यामुळे विमा कंपनीने क्‍लेम नाकारल्याचे ग्राहक मंचात सांगितले. तालुका कृषी अधिकाऱ्याचे प्रतिनिधी मंचात हजर राहिले. मात्र, त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्या जबाबाशिवाय दावा चालविण्यात आला. प्रथम खबरी अहवालानुसार तुकाराम हे दारू पिण्यासाठी घरातून कोळवण कातकरी वस्तीमध्ये गेले होते. दुसऱ्या दिवशी तेथे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे संगीता तेथे पाहण्यास गेल्या. त्यावेळी दगडाने ठेचून तुकाराम यांचा खून झाल्याचे दिसून आले. तुकाराम हे अंमली पदार्थ सेवन करून त्या अंमलाखाली होते. तरीही त्या अंमली पदार्थाच्या सेवनाने त्यांचा मृत्यू झाला नाही. दगडाने ठेचून मारल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या मृत्यूस आमंत्रण दिले हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे त्यांचा क्‍लेम नाकारणे अयोग्य ठरेल, असा निष्कर्ष काढत मंचाने विमा कंपनीला आदेश दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.