पुणे – खरिपाची लगबग सुरू; पेरणीचा हंगाम आला फक्‍त दीड महिन्यांवर

यंदा 26 हजार 573 क्विंटल बियाणांची मागणी

पुणे – खरीप हंगामाला एक ते दीड महिने राहिला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून खरिपाची तयारी सुरू झाली आहे. यंदा (2019-20) जिल्ह्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे सुमारे 26 हजार 573 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे.

यंदा 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षीचा खरीप हंगाम चांगला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाण्यांची अडचण भासू नये, म्हणून कृषी विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 2 लाख 88 हजार 237 हेक्‍टर आहे. मागील काही वर्षातील अनुभव पाहता उपलब्ध क्षेत्रापैकी 1 लाख 87 हजार 300 हेक्‍टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात बियाणांची कमी अधिक प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामध्ये 2016 मध्ये 22 हजार 783 क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. यंदा चांगल्या पावसामुळे खरीपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरुन कृषी विभागाने 26 हजार 573 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. खासगी कंपन्यांकडून 11 हजार 204 तर महाबीज व राष्ट्रीय बीज निगम विभागाकडून 15 हजार 369 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे. महाबीजकडून 14 हजार 842 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे.

खरीप हंगामासाठी मागणी केलेल्या बियाण्यांमध्ये संकरित ज्वारी, संकरीत बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन, वाटाणा, ताग आदींच्या बियाण्यांचा समावेश आहे. कृषी विभागाने 13 हजार क्विंटल भात बियाण्याची मागणी नोंदवली आहे. त्यानंतर 6 हजार 191 क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी केली आहे.

पिकनिहाय बियाण्यांची मागणी (क्विंटलमध्ये)
खरीप ज्वारी 77, संकरीत बाजरी 1 हजार 297, सुधारीत बाजरी 432, भात 1 हजार 300, मका 1 हजार 888, तूर 118, मुग 278, उडीद 112, भुईमुग 1 हजार 265, तीळ 1, सुर्यफुल 4, सोयाबीन 6 हजार 191, वाटाणा 710, ताग 600.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.