डोंगराळ भागातील नागरिकांसाठी पाण्याची साठवण
पुणे – दुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी, यासाठी जिल्ह्यातील विविध 31 ठिकाणी खडकातील टाक्यांच्या कामांना सुरवात करण्यात आली आहे.
नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही कामे हाती घेण्यात आली असून, या टाक्यांमुळे भविष्यातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत.
सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या दुर्गम, डोंगराळ भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. या भागात उतार अधिक असल्याने हे पाणी साठून न राहता वेगाने वाहून जाते. त्यामुळे पाण्याअभावी तेथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर टंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्यामुळे बहुतांश डोंगराळ भागातील गावे, वाड्या-वस्त्यांना टॅंकरचे पाणीपुरवठा केला जात आहे. डोंगराळ भागात टॅंकरने पाणीपुरवठा करणे आणि पाणी पुरवठ्यासाठी उपसा योजना करणे शक्य होत नाही. परिणामी रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर अंतरापर्यंत पायपीट करावी लागते. याअधी काही भागात अशा टाक्या खोदल्याने पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
त्यानुसार यावर्षी जिल्ह्यातील 31 खडकातील टाक्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये वेल्हा आणि खेड तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी 7 टाक्या घेण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आंबेगाव, भोर, जुन्नर आणि मावळ येथे प्रत्येकी 4 तर मुळशी येथे 1 खडकातील टाक्या घेण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 25 लक्ष रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येणार आहे.