स्थायी समितीची मान्यता : खेळाडूंना मिळणार 31 मार्च पूर्वी शिष्यवृत्ती
पुणे – महापालिकेच्या क्रीडा धोरणांतर्गत शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पालिकेकडून देण्यात येणाऱ्या क्रीडा शिष्यवृत्तीस क्रीडा समिती पाठोपाठ स्थायी समितीनेही मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला असून लोकसभा निवडणुकीपूर्वी ही शिष्यवृत्ती खेळाडूंना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेकडून शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योन्मुख खेळाडूंना 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यंदाच्या शिष्यवृत्तीसाठी सुमारे 100 अर्ज आले होते. त्यातील 52 अर्ज पात्र झाले असून उर्वरित 48 अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र, अनेक खेळाडूंना पालिकेने दिलेल्या वेळेत कागदपत्रे सादर न करता आल्याने त्यांनी शहरासाठी योगदान देऊनही या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच काही खेळाडूंनी महापालिकेने मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही केली होती. त्यानंतर, ज्या खेळाडूंकडे कागदपत्रे आहेत. मात्र, केवळ मुदतीत ती त्यांना देता आली नाहीत. त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती खेळाडूंना व्हावी यासाठी क्रीडा विभागाकडून या खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्याचा निर्णय घेत 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीचा फायदा आणखी 7 खेळाडूंना झाला असून या शिष्यवृत्तीसाठी 59 खेळाडू पात्र झाले झाले होते. त्यानुसार, या खेळाडूंना जिल्हास्तर ते आंतरराष्ट्रीय खेळाडू अशा गटात विभागून दहा हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. क्रीडा समितीने मान्यता दिल्यानंतर मंगळवारी हा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला होता. समितीने त्यास मान्यता दिली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा