पुणे – कॅन्टोन्मेंट हद्दीत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद

नागरिक त्रस्त : पाच निविदा काढूनही संस्थांचा प्रतिसाद नाही

पुणे – शहरातील विविध परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लष्कर परिसरात देखील भटक्‍या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या, त्यांच्यामुळे अपघात घडल्याचे अनेक घटना घडत आहेत. मात्र परिसरातील भटक्‍या कुत्र्यांवर आळा घालायचा कसा? असा प्रश्‍न कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला पडला आहे.

कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिक भटक्‍या कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत, तर रात्री रस्त्यावरून दुचाकी चालविताना कुत्र्याच्या झुंडींनी पाठलाग केल्यामुळे वाहनचालक जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत. त्याची दखल घेत बोर्ड प्रशासनाने मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम खासगी संस्थेला दिले. या संस्थेतर्फे भटक्‍या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया आणि ऍन्टी रेबिज लसीकरण केले जात होते. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी, जाळी, वाहन व चालकाची व्यवस्थाही संस्थेने केली होती. त्याबदल्यात प्रशासनाकडून प्रत्येक कुत्र्यामागे 650 रुपये दिले जात होते. मात्र, सात महिन्यांपूर्वी संस्थेने हे काम थांबवित कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहनासाठी इंधनाचा दर लक्षात घेत दर वाढवून देण्याची मागणी बोर्डाकडे केली.

त्यानुसार, संबंधित संस्थेला तब्बल 1 हजार रुपयांपर्यंत दर वाढवून देण्याचा निर्णयही बोर्डाने सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानुसार बोर्डाने तब्बल पाच वेळा निविदाही काढल्या. मात्र, त्याला स्वयंसेवी संस्था अथवा ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.